ऑफिसमधील वातावरण कसे असावे, हे बहुतांशी कर्मचारी आणि त्यांच्या बॉसवर अवलंबून असते. अनेकदा बॉससोबत पटत नसल्याने राजीनामे दिले जातात. जोवर पटते तोवर ठीक, खटके उडायला लागले की कर्मचारी स्वत:ला मानसिक दृष्ट्या त्रास होत असल्याचे समजू लागतात. हे सर्वच कंपन्यांतील सर्वाधिकवेळा दिले जाणारे कारण आहे. परंतू, ऑफिसमधील सहकारी लग्नाला आले नाहीत, म्हणून कोणी राजीनामा देत असेल, तर हे नवीनच आहे.
चीनमधील एका तरुणीने बॉसकडे लग्नानंतर थेट राजीनामा पाठविला आहे. या तरुणीचे लग्न ठरले होते. तिने ऑफिसमधील सरसकट ७० सहकर्मचाऱ्यांनाही निमंत्रण दिले होते. यात तिच्या काही खास होते, काहींशी तिचे पटत नव्हते, तर काहींशी ठीक ठाक संबंध होते. खास लोकांनाच निमंत्रण दिले तर उगाच इतरांची नाराजी नको म्हणून तिने सर्वांनाच निमंत्रण दिले. सहकारी कर्मचाऱ्याचे लग्न आहे, सुटीचा दिवस आहे, सगळे येतील अशी तिची अपेक्षा होती.
यासाठी तिने या सत्तर जणांनाही गृहीत धरून जेवणाची ऑर्डर दिली होती. परंतू लग्नामध्ये फक्त एकच सहकारी आली. तिला घरच्यांनी जेवन टाकून द्यावे लागले म्हणून झापले. तिला सर्व नाही पण तिच्याशी चांगले संबंध असलेले तरी येतील अशी अपेक्षा होती. जी आली ती तिची सेक्रेटरी होती. यामुळे ही तरुणी प्रचंड नाराज झाली. तिने लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी कंपनीला राजीनामा पाठवून दिला. सहकर्मचारी उपस्थित न राहिल्यामुळे तिला भरपूर अन्न फेकून द्यावे लागले इतकेच नाही तर तिला तिच्या कुटुंबासमोर अपमानास्पद वाटले. ऑफिसचा विचार करताना देखील तिला अपमानास्पद वाटले, यामुळे तिने तडकाफडकी राजीनामा देऊन टाकला.