लॉटरी लागली असे आपण म्हणतो ते काही प्रसंगांत शब्दश: खरे ठरते. लॉटरीचे तिकीट घेतल्यावर ते लागेलच, असे नाही. शिवाय तुम्ही मागितलेले तिकीट न मिळाल्यावर नाइलाज म्हणून घेतलेले तिकीट जेव्हा खरोखर तुम्हाला श्रीमंत करते ती म्हणजे लॉटरी. ओक्साना झाहारोव्ह (४६, रा. एजवॉटर, न्यूजर्सी) या मॅनहॅटनमध्ये शॉपिंगला गेल्या. त्यांनी एक डॉलर किमतीचे न्यूयॉर्क लॉटरीचे स्क्रॅच करायचे तिकीट विक्रेत्याला मागितले. त्याच्याकडून अजाणतेपणी त्यांना १० डॉलर किमतीचे ‘तिकीट फॉर लाइफ’ योजनेतील तिकीट दिले गेले. झाहारोव्ह यांच्या लक्षात ही चूक आली. मला वाईट वाटले. परंतु जाऊ द्या, असे म्हणून मी ते विकत घेतले, असे त्या म्हणाल्या. मी ते तिकीट स्क्रॅच करायच्या आधी पुस्तकात खूण म्हणून जवळपास दोन आठवडे वापरले, असे त्यांनी सांगितले. त्या तिकिटाने त्यांना पाच दशलक्ष डॉलर्स जिंकून दिले. ही रक्कम त्यांना २० वर्षांत दिली जाईल व त्यानंतर आयुष्यभर झाहारोव्ह यांना दरवर्षी निव्वळ १७२,०६८ डॉलर मिळतील. झाहारोव्ह यांच्या या लॉटरीचे वृत्त मंगळवारी सर्वत्र पसरले. त्या म्हणाल्या,‘‘मी कधीही काहीही जिंकलेले नाही. हे तिकीट लॉटरीच्या कार्यालयात आणेपर्यंत ते बनावट असल्याची माझी खात्री होती. तेथे आल्यावर ते खरेखुरे असल्याचे मला समजले.’’ आता झाहारोव्ह यांना त्यांच्या कुटुंबाला बहामास येथे सुटीवर न्यायचे आहे व मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च करायचा आहे.
इच्छा नसताना घेतलेल्या लॉटरी तिकिटाने केले श्रीमंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:30 AM