भारतातच काय तर जगभरात भिक मागणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. तसेच अनेक भिक मागणाऱ्या लोकांबाबत अनेक अवाक् करणाऱ्या घटनाही समोर येत असतात. हे लोक रोज भिक मागून किती कमाई करतात किंवा त्यांच्या खात्यांमध्ये किती पैसे असतात हेही समोर येत असतं. भारतात असे अनेक भिकारी आहेत जे फार श्रीमंत आहेत. त्यातीलच एक भिकारी मुंबईत आहे. त्याचं नाव भरत जैन आहे. हा भिकारी कोट्याधीश असल्याचं सांगितलं जातं.
भरत जैन नावाची व्यक्ती मुंबईतील छत्रपति शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदानात भिक मागतो. असं काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, भरज जैन याच्याकडे मुंबईत आणि पुण्यात कोट्यावधी रूपयांचे फ्लॅट्स आणि दुकाने आहेत. इतकंच नाही तर त्याची मुले कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतात. तो स्वत: मुंबईत 1.20 कोटी रूपये किंमतीच्या फ्लॅटमध्ये राहतो. त्याने भिक मागून कोट्यावधी रूपयांची संपत्ती जमा केली आहे. तसेच त्याने भिक मागून आपला बिझनेसही सुरू केला. इतकी संपत्ती असूनही भरत जैन अजूनही भिक मागतो.
भिक मागून वर्षाला लाखोंची कमाई
कुटुंबियातील लोकांनी अनेक मनाई केली तरी भरत जैन अजूनही भिक मागण्याचं काम करतो. भरत जैनच्या परिवारात पत्नी, दोन मुले, एक भाऊ आणि वडील आहेत. भरत जैन दर महिन्याला भिक मागून साधारण 75 हजार रूपये कमाई करतो. म्हणजे दर दिवसाला सरासरी त्याची कमाई 2500 रूपये इतकी होते. वर्षाला तो 9 लाख रूपयांपर्यंत कमाई करतो.
एका अंदाजानुसार, भरत जैनची एकूण संपत्ती 8.50 कोटी रूपये इतकी आहे. यात भिक मागण्याशिवाय त्याच्या बिझनेसमधून झालेलं उत्पन्नही आहे. भरत जैनकडे परळ भागात 2 बेडरूम, हॉल, किचन असलेला फ्लॅट आहे. त्याशिवाय ठाण्यात त्याच्याकडे दोन दुकाने आहेत. यातून त्याला दर महिन्याला 50 हजार रूपये भाडं मिळतं.
पुण्यातही आहे घर
भरत जैनच्या ठाण्यातील दुकानांची किंमत कोट्यावधी असल्याचं सांगितलं जातं. भरतचा परिवार एक स्टेशनरी स्टोरही चालवतो. ज्यातूनही कमाई होते. त्याशिवाय त्याचं पुण्यातही घर आहे. जे त्याने भाड्याने दिलं आहे. अशात त्याची कमाई अजून जास्त होते.