शाहजहापूर: उत्तर प्रदेशातील शाहजहापूरमध्ये एक भलताच प्रकार घडला आहे. लग्नात दारूवरून वाद झाल्यानं दोन्ही कुटुंबांनी थेट पोलीस ठाणं गाठलं. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नवरदेवानं मुलीच्या गावात पायसुद्धा ठेवणार नाही म्हणत संताप व्यक्त केला. त्यामुळे सगळेच पेचात पडले. अखेर पोलिसांना हा पेच सोडवण्यात यश आलं. रामचंद्र मिशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या तरुणीचा विवाह खुदागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खिरिया गावातील कमवेश वर्मासोबत निश्चित झाला. २१ मेच्या रात्री कमलेश वरात घेऊन मुलीच्या गावी पोहोचला. यावेळी दोन्ही बाजूंचे नातेवाईक उपस्थित होते. विधी संपन्न होते. रात्री १२ च्या सुमारास नवरदेवाचे नातेवाईक खूप दारू प्यायले. त्यांचा मुलीच्या नातेवाईकांशी वाद झाला. मुलीकडचे नातेवाईकदेखील दारू प्यायले होते. हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं.वाद वाढल्यानं नवरदेव सात फेरे घेण्यापूर्वीच गावाच्या बाहेर पडला. हळूहळू त्याचे नातेवाईकदेखील गावाबाहेर आले. नवरदेव वरात माघारी नेत असल्याचं पाहून मुलीच्या वडिलांनी रामचंद्र मिशन पोलीस ठाणं गाठलं. याची माहिती मिळताच मुलाकडची मंडळीदेखील पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या गावात माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हणत नवरदेवानं गावात जाण्यास नकार दिला. अखेर पोलीस ठाण्यातच लग्न लावण्यास दोन्ही बाजूंनी तयारी दर्शवली. पोलीस ठाण्याच्या परिसरात खुर्च्या ठेवण्यात आल्या. त्यानंतर पोलीस आणि नातेवाईकांच्या साक्षीनं विवाह सोहळा संपन्न झाला.
लग्नात दारूवरून राडा; नवरदेव भडकला, पोलीस ठाण्यात पोहोचला अन् भलताच प्रकार घडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 10:55 AM