लॉकडाऊनमध्ये प्रेम, युद्धात लग्न! भारतीय तरुणाशी सात फेरे घेण्यासाठी युक्रेनमधून पळून आली 'ती' अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 03:28 PM2022-03-25T15:28:43+5:302022-03-25T15:39:19+5:30
युक्रेनमधील एक तरुणी भारतीय मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि आता ते दोघं लग्नही करणार असल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं देखील म्हणतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. युक्रेनमधील एक तरुणी भारतीय मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि आता ते दोघं लग्नही करणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतात राहणारा 33 वर्षीय अनुभव भसीन, हा व्यवसायाने दिल्ली उच्च न्यायालयात वकील आहे, त्याची 29 वर्षीय युक्रेनची गर्लफ्रेंड एन्ना होरोदेत्स्का ही प्रेमापोटी कीव येथून आता भारतात आली आहे. भयावह वातावरणातून ती भारतात पोहोचताच अनुभवने तिला लग्नासाठी विचारलं आहे.
अडीच वर्षांपूर्वीच्या एका प्रवासादरम्यान या दोघांची ओळख झाली. पण 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे जग बंद असताना त्यांच्यातील नातं खऱ्या अर्थाने फुललं. अनुभव आणि एन्ना भारतात एकत्र प्रवास करत होते. एन्ना एका आयटी कंपनीत काम करत होती आणि घरी मेकअपचे कामही करायची. पण लॉकडाऊनमुळे उड्डाणे रद्द झाल्यावर एन्ना भारतात अडकली. त्यामुळे तोपर्यंत ती अनुभवच्याच घरीच राहिली. यादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एन्नाने अनुभवच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती युक्रेनला परतली.
सर्व काही नीट, सुरळीत सुरू होतं परंतु 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनशी युद्ध पुकारलं आणि तेव्हा सर्वच बदललं. एन्नाच्या घराबाहेर सातत्याने बॉम्बस्फोट होत होते. भयंकर परिस्थिती होती. त्यानंतर तिने 27 तारखेला पोलंडला जायचे ठरवले. म्हणून तिने काही उबदार कपडे आणि आवश्यक गोष्टी पॅक केल्या, स्टेशनवर पोहोचण्यासाठी कॅब शोधली, जिथे तिने तिच्या आईला सोडलं. त्यानंतर लिविवला जाण्यासाठी एन्नानी दोन तास ट्रेनची वाट पाहिली. हे ठिकाण युक्रेनच्या पश्चिमेला आणि पोलिश सीमेजवळ आहे.
28 रोजी तिने पोलंडहून बस घेण्याचे ठरवले, परंतु येथे तिला कळलं की लोक पोलंडची सीमा ओलांडण्यासाठी 24 तासांपेक्षा जास्त काळ वाट पाहत आहेत. आपला निर्णय बदलून तिने स्लोवाकियाला जाण्याचे ठरवले. अशा प्रकारे ती मध्यरात्री सीमेवर पोहोचली, तिथे थोडा वेळ थांबून ती पायीच सीमा ओलांडली. स्लोवाकियामध्ये प्रवेश करताच ती मिनीबसने पोलंडमधील क्राकोव येथे पोहोचली. तिथे काही मित्र होते त्यांनी खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली. अखेर एन्नानी पोलंडमध्ये भारताच्या व्हिसासाठी अर्ज केला आणि व्हिसा मिळताच तिने लगेचच भारत गाठलं. जिथे अनुभव तिची आतुरतेने वाट पाहत होता. यानंतर आता लवकरच ते दोघं लग्न करणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.