Saas Bahu Temple Udaipur : तुम्ही तशी तर भगवान शिवा, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान गणेशाची वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील. पण कधी तुम्ही सासू-सुनेचं मंदिर पाहिलंय का? तुम्हाला नक्कीच अशाप्रकारच्या मंदिराबाबत जाणून घेऊन आश्यर्य वाटेल. हे मंदिर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आहे. आणि या मंदिराच्या निर्माणाची कथाही फारच रोमांचक आहे.
सास-बहू म्हणजेच सासू सुनेचं हे प्रसिद्ध मंदिर एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पण नावानुसार, अनेकांना वाटलं असेल की, या मंदिरात सासू-सुनेची पूजा केली जाते. तर मुळात हे तसं नाही. या मंदिरात भगवान विष्णु आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. सुनेचं मंदिर सासूच्या मंदिरापेक्षा थोडं लहान आहे. १०व्या शतकात तयार करण्यात आलेल्या या मंदिराला अष्टकोनी छत आहे. मंदिराच्या भींतींवर रामायणातील वेगवेगळ्या घटना कोरल्या आहेत. मूर्तींना दोन भागात अशाप्रकारे व्यवस्थित ठेवण्यात आलं आहे.
सासू-सुनेच्या या मंदिरात एकाच मंचावर त्रिमुर्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णु आणि महेशाची मूर्ती कोरण्यात आली आहे. तर दुसऱ्या मंचावर राम, बलराम आणि परशुरामाचे चित्र आहे. असे म्हणतात की, मेवाड राजघराण्याच्या राजमातेसाठी भगवान विष्णुचं मंदिर आणि सुनेसाठी शेषनागाचं मंदिर तयार केलं होतं. सासू-सुनेसाठी हे मंदिर तयार करण्यात आलं असल्यानेच या मंदिराला सासू-सुनेचं मंदिर म्हणून ओळखलं जातं.
असं मानलं जातं की, ११०० वर्षांपूर्वी या मंदिराचं निर्माण राजा महिपाल आणि रत्नपाल यांनी केलं होतं. राजमाता या भगवान विष्णुच्या भक्त होत्या त्यामुळे आधी भगवान विष्णुचं मंदिर तयार करण्यात आलं. त्यानंतर राजा महिपाल यांचं लग्न झालं. राजा महिपालाच्या पत्नी या भगवान शिवाच्या भक्त होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी भगवान शिवाचं मंदिर तयार करण्यात आलं.
सासू-सुनेचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात भगवान विष्णुची ३२ मीटर उंच आणि २२ मीटर रूंद प्रतिमा आहे. या प्रतिमेला हजारो भूजा आहेत. त्यामुळे हे मंदिर सहस्त्रबाहु मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. भगवान विष्णु आणि भगवान शिवाच्या मंदिराच्या मधे एक भगवान ब्रम्हाचंही एक मंदिर आहे.
अशीही एक मान्यता आहे की, इथे सर्वातआधी भगवान श्रीकृष्णाचं मंदिर बांधण्यात आलं होतं. यातील प्रतिमेला हजारो बाहु आहेत. कालांतराने सहस्त्रबाहु या शब्दाची फोड करून लोक या मंदिराला सास-बहू मंदिर म्हणू लागले.
असेही म्हटले जाते की, या मंदिराच्या जवळपासच मेवाड राजवंशाची स्थापना झाली होती. असे म्हणतात की, या परिसरावर जेव्हा मुघलांनी ताबा मिळवला होता तेव्हा हे मंदिर वाळू आणि चुन्याच्या मदतीने बंद केलं होतं. मात्र नंतर जेव्हा इंग्रजांनी इथे ताबा मिळवला हे मंदिर पुन्हा खुलं करण्यात आलं.