नवी दिल्ली - तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्या अनेक गोष्टी या सहज शक्य होतात. शेती आणि इतर व्यवसायात तंत्रज्ञानाची हमखास मदत घेतली जाते. शेतकरी शेतात चांगलं पीक यावं यासाठी आवश्यक खतं आणि काही गोष्टींचा वापर करतात. तसेच गायीने भरपूर दूध द्यावं यासाठी तिला चांगला चारा दिला जातो. मात्र गाणं ऐकल्यानंतर गाय भरपूर दूध देते आणि शेतात भरघोस पीक येतं असं जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. मध्य प्रदेशमधील एका तरुण शेतकऱ्याने हा दावा केला आहे.
आकाश चौरसिया असं या शेतकऱ्याचं नाव असून त्याने शेती आणि पशूपालनासाठी ही हटके पद्धत शोधून काढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश कपूरिया गावचा रहिवासी आहे. शेतात भरपूर पिक यावं आणि गायीने खूप दूध द्यावं यासाठी तो शेताला आणि गायींनी संगीत ऐकवतो. शेत आणि प्राण्यांना गाणं ऐकवून तो आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्याचं उत्पन्नही वाढतं. आकाश आपल्या या अनोख्या पद्धतीमुळे खूपच लोकप्रिय झाला आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी त्याच्याकडे अनेक लोक येतात.
आकाश जैविक पद्धतीनं 16 एकर जमिनीवर शेती करतो. हळद, आलं, टोमॅटो अशी पिकं तो पिकवतो. आपल्या शेतात त्याने एक मोठी म्युझिक सिस्टम लावली आहे. स्वतःसाठी नाही तर शेतासाठी. शेतांना तो संगीत ऐकवतो. गायीचं दूध काढतानाही तो संगीत लावायला विसरत नाही असं देखील म्हटलं आहे. त्याच्या या प्रयोगामुळे शेतात पीक चांगलं येतं आहे. फळं-फुलं लवकर येत आहेत. गायीची दूध देण्याची क्षमताही वाढते आहे असं म्हटलं जात आहे.
"शेती ही नैसर्गिकरित्या होते. निसर्गाचा एक नियम असतो. आपण फक्त बीज रोवतो आणि निसर्ग त्याचं झाड, वृक्ष बनवतं. सुरुवातीला या प्रक्रियेत मधमाशा, फुलपाखरू अशा छोट्या छोटया जीवांचाही समावेश होता. जसं माणूस आपला तणाव दूर करण्यासाठी फिल्म पाहणं, शांत ठिकाणी बसणं, गाणी ऐकणं पसंत करतो. तसंच झाडाझुडपांनाही तणाव दूर करण्यासाठी निसर्गानं जैवविविधता दिली. पण आता फुलपाखरू, मधमाश्या फार राहिल्या नाहीत. त्यामुळे मी झाड, पिकांमधील तणाव दूर करण्यासाठी त्यांना संगीत ऐकवतो" असं आकाशने म्हटलं आहे.
आकाशचा हा प्रयोग देशभरात पसरला आहे, त्यामुळे इतर राज्यांतूनही शेतकरी त्याच्याकडे प्रशिक्षण घ्यायला येतात. आग्राहून ट्रेनिंग घेण्यासाठी आलेले राजीव कुमार यांनी सांगितलं, जैविक शेतीबाबत मी इथं खूप काही शिकलो. गायींना संगीत ऐकवलं जातं. ज्यामुळे त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेत बराच फरक पाहायला मिळाला. शेतातही याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. इंटरनेटवरून मला आकाशबाबत माहिती मिळाली. आम्ही इथं बरंच काही शिकलो. संगीताचा जीवजंतू, झाडाझुडुपांवर कसा परिणाम होतो हे आम्ही पाहिलं असं तर मुंबईच्या योगेश सिंहने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.