Supreme Court on Sanjha Chulha name Controversy: हल्लीच्या काळात रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. हॉटेल सुरू करताना प्रत्येक जण आपलं आवडतं नाव त्याला देत असतं. पण या हॉटेलच्या नावावरून कधी थेट सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल असं कुणाला वाटलं असेल का? पण असं खरंच झालंय. दिल्ली आणि फरीदाबादमधील एकाच नावाच्या दोन रेस्टॉरंटमधील नावावरून वाद वाढत गेला असून आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. दिल्लीतील एका रेस्टॉरंटच्या मालकाने गुन्हा दाखल केला असून त्याच्या रेस्टॉरंटच्या नावावर फरीदाबादमध्ये ढाबा सुरू असल्याचा आरोप त्याने केला आहे. यासोबतच रेस्टॉरंटच्या मालकाने या नावाच्या वापरावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.
नक्की कसा सुरू झाला वाद?
दिल्लीतील कैलाश कॉलनी, डिफेन्स कॉलनी आणि चित्तरंजन पार्कमध्ये नंद किशोर यांच्या मालकीची 'सांझा चुल्हा' नावाची रेस्टॉरंट्स आहेत. 1986-87 मध्ये त्यांनी हे रेस्टॉरंट सुरू केले होते आणि तेव्हापासून ते ही रेस्टॉरंट चालवत असल्याचा त्यांचा दावा आहे. परंतु फरीदाबादमध्ये याच नावाचे आणखी एक रेस्टॉरंट ढाबा सुरू करण्यात आला असून त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, नंद किशोर यांचे वकील विवेक तन्खा यांनी दावा केला आहे की, दिल्लीतील 'सांझा चुल्हा' रेस्टॉरंट मुगलाई आणि भारतीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु फरीदाबाद रेस्टॉरंट या नावाचा वापर करून त्याचा फायदा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या नावाच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
'सांझा चूल्हा' हे रोजच्या वापरातील शब्द: सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या दरम्यान खंडपीठाने वकील विवेक तन्खा यांना विचारले की, तुमचे तक्रारदार 'सांझा' आणि 'चुल्हा' या शब्दांची नोंदणी करू शकतात का? किंवा ते या शब्दावर कॉपीराइटचा दावा करू शकतात का? कारण, 'सांझा चुल्हा' हे रोजच्या वापरातील आणि सर्वसामान्यांच्या बोलण्यातील शब्द आहेत. तसेच, रेस्टॉरंट फरीदाबादमध्ये असेल तर ग्राहकांची फसवणूक करण्याचा येथे प्रश्नच येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले.
फरीदाबादच्या रेस्टॉरंटने केला असा युक्तिवाद
व्यावसायिक न्यायालयात सुनावणीदरम्यान, फरीदाबाद मधील 'सांझा चुल्हा' रेस्टॉरंटने आपल्या युक्तिवादात म्हटले होते की हा शब्द दिल्लीतील कोणत्याही रेस्टॉरंटमधून घेण्यात आलेला नाही. त्यांनी सांगितले की हा एक पंजाबी शब्द आहे, ज्याचा अर्थ 'सामुदायिक मातीची चूल' असा आहे. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की, 1990-91 मध्ये दूरदर्शनवरही 'सांझा चुल्हा' नावाची मालिका यायची.
कमर्शियल कोर्ट, हायकोर्टाने आधीच फेटाळली होती याचिका
सर्वोच्च न्यायालयात येण्याआधी हे प्रकरण व्यावसायिक न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळले होते. व्यावसायिक न्यायालयाने सुनावणीदरम्यान दोन्ही रेस्टॉरंटच्या विक्रीची तुलना देखील केली, त्यामुळे 2020-21मध्ये फरीदाबादमधील रेस्टॉरंटने दिल्लीतील रेस्टॉरंटपेक्षा ३३ पट जास्त विक्री केली होती. यानंतर न्यायालयाने 'सांझा चुल्हा' नावाच्या वापरावर बंदी घालण्यास नकार दिला होता. नंतर दिल्ली उच्च न्यायालयानेही या प्रकरणी व्यावसायिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.