घरात सुख, संपत्ती नांदण्यासाठी साजऱ्या करण्यात येणारा धनत्रयोदशी हा दिवाळीतील पहिला दिवस. देशभर हा सण उत्साहात साजरा करतात. दिवाळीत घरासमोर छान रेखीव रांगोळी काढण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीपासून आपण रांगोळी काढायाला सुरुवात करतो. अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत प्रत्येकाच्या दारात रांगोळी पाहायला मिळतेच. प्रत्येकदिवशी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन रांगोळी काढण्याचा मानस प्रत्येक शहरातील कलाकारात असतो. त्याचप्रमाणे पुणे-मुंबई शहरातही अनेक विविध संकल्पना साकारून रांगोळी काढली जाते.
आम्ही तुम्हाला काही हटके रांगळोच्या डिझाईन्स देतोय, ज्या तुम्ही तुमच्या दारात अगदी सहज काढू शकाल.
धनत्रयोदशीला या शहरांमध्ये खासकरून संस्कार भारतीची रांगोळी काढतात. खरतर कोणत्याही सण-समारंभात संस्कार भारतीच रेखाटली जाते. शिवाय दिवाळीतही ठिपक्यांच्या रांगोळीपेक्षाही संस्कार भारतीचीच जास्त चलती आहे. त्याचप्रमाणे धनत्रयोदशीलाही संस्कार भारती रेखाटली जाते. पुण्यातील आळेफाटा येथे राहणारा तेजस गुंजाळ म्हणतो की, 'आम्ही नेहमीच संस्कार भारती रांगोळी काढतो. धनत्रयोदशीपासून सायंकाळची रांगोळी काढली जाते. दरदिवशी आमची नवी संकल्पना असते. त्यामुळे धनत्रयोदशीला फक्त संस्कार भारतीच आम्ही काढतो.'
तर, मुंबईत राहणारा अभिषेक साटम म्हणतो की, 'आम्ही नेहमीच संस्कार भारतीची आरास करतो. त्यात नवनवे रंग भरुन रांगोळी छान सजवली जाते. फुलांचाही वापर केला जातो. संस्कार भारतीमध्ये अनेक एक्सपेरिमेंट करायला मिळतात. आपल्यातील सृजनात्मकतेचा वापर करून संस्कार भारती मी रेखाटण्याचा प्रयत्न करतो.'
एकूणच काय सध्या संस्कार भारतीची फार चलती आहे. पूर्वी ठिपक्यांची रांगोळी फार प्रसिद्ध होती. कोण किती जास्त ठिपक्यांची रांगोळी काढणार याची स्पर्धा पूर्वी असायची, आता संस्कार भारती प्रसिद्ध असल्याने अनेक रांगोळी कलाकार संस्कार भारतीलाच जास्त महत्व देत आहेत.