डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनमध्ये Rx ऐवजी लिहिले 'हे' नाव, सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 01:45 PM2022-10-17T13:45:54+5:302022-10-17T13:49:40+5:30
सतना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश सिंह यांनी लिहिलेले हे प्रिस्क्रिप्शन सध्या व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशात मेडिकल स्टडी (Medical Study) म्हणजेच एमबीबीएसचा (MBBS) अभ्यास हिंदी भाषेत सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, येथील सतनामधील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने मेडिकल स्डटी हिंदीत सुरू झाल्यापासून 24 तासांच्या आत रूग्णाचे प्रिस्क्रिप्शन हिंदीमध्ये लिहिले आहे. सतना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश सिंह यांनी लिहिलेले हे प्रिस्क्रिप्शन सध्या व्हायरल होत आहे.
खरंतर डॉ. सर्वेश सिंह यांनी या प्रिस्क्रिप्शनमध्ये Rx ऐवजी 'श्री हरी' लिहिलं आहे आणि खाली हिंदी भाषेत सर्व औषधांची नावेही लिहिली आहेत. आता या प्रिस्क्रिप्शनची राज्यभर चर्चा होत आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते की, जर प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधे हिंदीत लिहिली असतील तर काय नुकसान आहे? यानंतर डॉ. सर्वेश सिंह यांनी त्यांचा मुद्दा मान्य करून तो खरा करून दाखवला.
दरम्यान, उदाहरण देताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले होते - 'Rx च्या जागी 'श्री हरी' लिहा आणि क्रोसिन खाली लिहा... यात काय अडचण आहे.' यानंतर डॉ. सर्वेश सिंह यांनी पोटदुखीने त्रस्त महिलेसाठी हिंदीत प्रिस्क्रिप्शन लिहिले. तसेच, त्या महिलेचा केस स्टडीही त्यांनी हिंदीत लिहिली. तसेच, 'श्री हरी' लिहिताना त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये 5 औषधं लिहिली, सगळी नावं फक्त हिंदीत लिहिली होती.
कोण आहेत डॉ. सर्वेश सिंह?
दरम्यान, डॉ. सर्वेश सिंह यांनी 2017 मध्ये इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. डॉ. सर्वेश सिंह तीन वर्षांपूर्वी सतना जिल्ह्यातील कोटोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ते येथील लोकांवर उपचार करत आहेत.