अनेक देशांत लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला असला तरी, जगभरातील माणसांची संख्या मात्र वाढतेच आहे. या वाढत्या लोकसंख्येला राहायला जागा कुठून आणायची, त्यांच्यासाठी अन्न-पाण्याची, जीवनावश्यक गोष्टींची व्यवस्था कुठून, कशी करायची, हा सगळ्या जगासमोरचाच सध्या यक्षप्रश्न आहे. सध्या तरी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जागेचा. यावर तात्पुरता उपाय म्हणून अनेक देशांत, अगदी भारतातही अनेक मोठ्या शहरांत आता ‘रो-हाऊस’सारखे उपक्रम बंद करण्यात आले आहेत. बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पासाठी आता फक्त इमारतीच बांधता येतील. कारण रो-हाऊसच्या तुलनेत तिथे जास्त लोक राहू शकतील. त्यामुळेच जगभरात आता सगळीकडेच घरांची वाढ आडवी होण्याऐवजी उभी म्हणजे व्हर्टिकल, आकाशाच्या दिशेने होत आहे. तरीही जागा कमीच पडते आहे.
या समस्येला उत्तर म्हणून सौदी अरेबियानं एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. ‘फ्यूचर सिटी’ म्हणजे भविष्यातलं एक शहर त्यांनी वसवायला घेतलं आहे. किती इमारती असतील या शहरात? किती लोकं तिथे राहू शकतील? आपल्या कानांवरही आपला विश्वास बसणार नाही, पण भविष्यातलं हे शहर म्हणजे केवळ एक इमारत असेल आणि या एकाच इमारतीत तब्बल ९० लाख लोक राहू शकतील!सौदी अरेबियाचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी नुकतीच या प्रकल्पाची घोषणा केली आहे. २०३० पर्यंत सौदी अरेबियाच्या वाळवंटात भविष्यातील हे शहर साकारलेलं असेल, असं सलमान यांचं स्वप्न आहे. त्यासाठी धुमधडाक्यात ते कामालाही लागले आहेत. पैशांच्या राशी या प्रकल्पावर ओतल्या जात आहेत. या प्रकल्पासाठी तब्बल ५०० अब्ज डॉलर्सचा (सुमारे ४० लाख कोटी रुपये) खर्च येणार आहे.
शेजारच्या देशातील दुबई, अबुधाबी या चकाचक शहरांना टक्कर देण्यासाठी आणि जगातले सर्वाधिक पर्यटक आपल्याकडे वळवण्यासाठी, आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठीही सलमान यांनी या प्रकल्पात डोकं घातलं आहे. केवळ ही इमारत पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे दहा कोटी पर्यटक येथे येतील आणि त्यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा वारू तुफान वेगानं पळायला लागेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
‘द लाईन’ असं या प्रकल्पाचं नाव आहे. या प्रकल्पाद्वारे सौदी अरेबियानं जगातील पहिली ‘व्हर्टिकल सिटी’ तयार करायला घेतली आहे. या इमारतीची रुंदी केवळ दोनशे मीटर (६५६ फूट) असेल, पण लांबी मात्र तब्बल १७० किलोमीटर असेल! समुद्रसपाटीपासून ही इमारत ५०० मीटर (१६४० फूट) उंचीवर उभारली जाईल.
एका जागेपासून दुसऱ्या जागी जाण्यासाठी या शहरात एकही वाहन नसेल, एकही कार नसेल, त्याऐवजी असतील त्या हाय स्पीड रेल्वे! १७० किलोमीटरचं हे अंतर कापण्यासाठी, म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी किंवा कोणालाही कुठूनही कुठेही जाण्यासाठी जास्तीत जास्त वीस मिनिटं लागतील!
ही ‘वन बिल्डिंग सिटी’ मुख्यत: काचेपासून तयार करण्यात येणार आहे. या इमारतीच्या बाहेरच्या बाजूला संपूर्णपणे काचेचा वापर करण्यात येईल. या शहराला रिन्युएबल एनर्जीद्वारे वीज पुरवण्यात येईल. येथे जी काही वीज तयार होईल, ती पूर्णत: सोलर, बायोमास आणि हायड्रो पॉवरपासून तयार झालेली असेल.
या संदर्भात सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, या शहरात हजारो आर्फिसेस असतील, मुलांसाठी शाळा, कॉलेजेस, मनोरंजन पार्क, वेगवेळी दुकानं, हाॅटेल्स, गरजेच्या साऱ्या काही गोष्टी इथे असतील. तरीही इथे कोणतंही प्रदूषण मात्र होणार नाही. इथली सगळी घरं एकावर एक म्हणजे आज कुठल्याही इमारतीत फ्लॅट्सची जशी रचना केलेली असते, त्याचप्रकारे इथल्या घरांची उभारणी केली जाईल. इथे राहायला येण्यासाठी लोकांच्या उड्या पडतील.
कोणता ‘इतिहास’ घडेल?
सौदी अरेबियानं हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असला, तरी त्याच्या यशस्वीतेबद्दल तज्ज्ञांनाही शंका वाटते आहे. कारण नजीकच्या भूतकाळात अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा तर केली गेली, पण ते पूर्णत्वास मात्र जाऊ शकले नाहीत किंवा ते पुढे ढकलावे लागलेत, हा ताजा इतिहास आहे. दुबई, चीन, म्यानमार, कोरिया येथील काही प्रकल्प रद्द तरी करण्यात आले आहेत किंवा लांबणीवर तरी ढकलण्यात आले आहेत.