राजकोट : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शिक्षण घेतलेल्या राजकोटमधील अल्फ्रेड हायस्कूलला टाळे लावण्यात आले असून, तेथील सर्व १५० विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) देण्यात आला आहे. राज्य सरकार या शाळेचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करणार आहे. शिक्षण विभागाने गेल्यावर्षी तशी अधिसूचना जारी केली होती. १८५३ साली सुरू झालेल्या अल्फ्रेड हायस्कूलमध्ये गांधीजींनी प्राथमिक शिक्षण घेतले होते. राजकोट इंग्लिश स्कूल, असे मूळ नाव असलेली ही शाळा या भागातील पहिली इंग्लिश शाळा होती. आता राज्य सरकार १२ कोटी रुपये खर्च करून येथे संग्रहालय उभारणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना करणसिंहजी हायस्कूलमध्ये पाठविण्यात येणार आहे. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना करणसिंहजी हायस्कूलमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शिक्षकांचेही समायोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात येते. संग्रहालयाबाबत बोलताना शाळेचे मुख्याध्यापक एम.एम. निमावत म्हणाले की, शाळेसोबत येथे संग्रहालय उभारले गेले असते, तर विद्यार्थ्यांना गांधीजींच्या जीवनाविषयी आणखीही बरेच काही शिकता आले असते.
बापूंच्या बालपणीच्या शाळेला टाळे, संग्रहालय होणार
By admin | Published: May 05, 2017 1:19 AM