मुलांसाठी लिहिणं-वाचणं लहान मुलांसाठी अतिशय महत्त्वपर्ण आहे, यात वादच नाही. मुलांच्या शिक्षणासाठी सरकार याबाबत किती सतर्क असू शकतं, याचं उत्तम उदाहरण अमेरिकेतील व्योमिंग येथील लारामी शहरात बघायला मिळालं. इथे सरकार केवळ एका मुलाला शिकविण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च करून एक शाळा सुरू करणार आहे.अर्थात, हे पहिलं प्रकरण नाही. लारामी शहरात १५ वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ मध्येसुद्धा केवळ एका मुलासाठी शाळा सुरू करण्यात आली होती. त्या वेळी या शाळेत शिकणाऱ्या एकमेव विद्यार्थ्यानं सांगितलं की, ही शाळा माझ्यासाठी फारच आगळीवेगळी होती. तिथं त्रास द्यायलाही कोणी यायचं नाही. लारामीमध्ये केवळ एका मुलाला शिकविण्यासाठी शाळा सुरू करण्यामागचं कारण, या परिसराचा मोठा भाग डोंगराळ आहे. शिवाय व्योमिंगच्या कायद्यानुसार, रहिवासी परिसरापासून दूर राहणाऱ्या लहान मुलांना जास्त लांब असलेल्या शाळांमध्ये प्रवेशच दिला जात नाही.डोंगराळ भाग असल्या कारणाने लारामीमध्ये रस्त्यांची स्थिती फारच वाईट आहे आणि त्यामुळे येथील मुलांना घेऊन येणं किंवा दूर शाळेत घेऊन जाणंही फार कठीण आणि अडचणीचे आहे. सरकारने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिकविण्याचा प्रयत्न केला होता, पण शिक्षकाच्या गैरहजेरीत विद्यार्थ्याला शिकविणं फार कठीण आहे, असं लक्षात आलं. या परिसरात फार वर्षांपासून एक शाळा आहे खरी, पण ती सध्या पूर्णपणे बंद आहे. खरं तर २00४ सालीच ती बंद करण्यात आली. तेव्हा तिथं २४0 विद्यार्थी शिकत होते. त्यांच्यासाठी ती बांधण्यात आली होती. आता एका विद्यार्थ्यासाठी तिथं शाळा सुरू होत आहे.
केवळ एका मुलाला शिकविण्यासाठी कोट्यवधींची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 2:35 AM