ऑनलाइन लोकमत -
हैदराबाद, दि. ३१ - 'शाळकरी मुलींवर होणारे लैगिंक अत्याचार, विनयभंगाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी मुलींच्या गणवेशात बदल करुन शॉर्ट ड्रेसऐवजी सलवार-कमीज देण्यात यावी', अशी मागणी महिला आमदार कोंडा सुरेखा यांनी केली आहे. कोंडा सुरेखा तेलंगणा राष्ट्र समितीच्या आमदार आहेत. कोंडा सुरेखा यांच्याकडे महिला विकास खातेदेखील आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.
लैंगिक अत्याचारावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान कोंडा सुरेखा यांनी आपलं मत मांडलं. 'शाळकरी आणि त्यातही मुख्यत: दहावीतील मुलींना सलवार-कमीज घालणं बंधनकारक करण्यात यावं. अनेक शाळांमध्ये मुलींसाठी शॉर्ट ड्रेस गणवेश आहे. सरकारने शॉर्ट ड्रेसऐवजी सलवार-कमीज ड्रेस कोड करावा', असं कोंडा सुरेखा बोलल्या आहेत.
'सलवार-कमीज घातल्याने मुलींचे संपुर्ण शरीर झाकले जाते त्यामुळे हे गरजेचे आहे असं सांगताना महिलांची छेड काढणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचंही', कोंडा सुरेखा बोलल्या आहेत. 'मुलींची छेड काढणा-या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही याची खात्री आपण करायला हवी तसंच ज्या सरकारी अधिका-यांविरोधात महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची गरज असल्याचं', कोंडा सुरेखा यांनी सांगितलं आहे.