Gold : भारतासहीत जगभरातील देशांमध्ये सोन्याचं विशेष महत्व आहे. नुसतं सोनं म्हटलं तरी अनेकांचे डोळे चकाकतात. या पिवळ्या रंगाच्या चमकदार धातुच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. वैज्ञानिकांच्या समुदायातही एक मत नाहीये. पण वैज्ञानिकांच्या एका मोठ्या वर्गाचं असं मत आहे की, पृथ्वीच्या आत दडलेलं सोनं ही पृथ्वीची संपत्ती नाही. तर ते सोनं अंतराळातील उल्कापिंडाच्या माध्यमातून इथं आलं आहे.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, या अनमोल धातूच्या उत्पत्तीबाबत वैज्ञानिकांनी जे तर्क सादर केले आहेत, त्यावर कदाचित कुणी विश्वास ठेवणार नाही. पण वैज्ञानिकांकडे याचे ठोस पुरावे आहेत. वैज्ञानिक जॉन एमस्ली यांचा दावा आहे की, हा धातू अंतराळातून उल्का पिंडाच्या रूपात पृथ्वीवर आला आणि त्यामुळे हा धातू पृथ्वीच्या बाहेरील भागात आढळून येतो.
सोन्याबाबतच्या या सिद्धांतावर सहमती दर्शवणारे सांगतात की, पृथ्वीच्या वरचा थर २५ मैल जाड आहे. यातील प्रत्येक १००० टन धातुमध्ये केवळ १.३ ग्रॅम सोनं होतं. साधारण साडे चार अब्ज वर्षांआधी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर पृथ्वीच्या वरच्या भागावर ज्वालामुखी आणि लाव्हारसाचे डोंगर होते. त्यानंतर लाखो वर्षात पृथ्वीच्या वरच्या भागावर असलेल लोखंड पृथ्वीच्या केंद्रात पोहोचलं. शक्यता ही आहे की, सोनं सुद्धा वितळून पृथ्वीच्या बाहेरील भागावर आढळून आलं.
इम्पिरिअल कॉलेज लंडनमधील भूगर्भशास्त्राचे अभ्यासक मथिया विलबोल्ड म्हणाले की, या तर्कावर सहज विश्वास ठेवता येत नव्हता. त्यामुळे विज्ञानाच्या माध्यमातून याचं विश्लेषण करण्यात आलं. विलबोल्ड म्हणाले की, 'सिद्धांतानुसार, पृथ्वीच्या वरच्या भागावर उल्कापिंडाचा पाऊस झाला. यात काही प्रमाणात सोनं होतं आणि यानेच पृथ्वीचा वरचा भाग सोन्याने भरला गेला. ही घटना साधारण ३.८ अब्ज वर्षांआधी घडली असावी'.
विलबोल्ट, ब्रिस्टल आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका टीमने ग्रीनलॅंडच्या काही डोंगराचं परिक्षण केलं. हे डोंगर साधारण ६० कोटी वर्षांआधी झालेल्या उल्कापिंडिय घटनानंतर पृथ्वीच्या मूळ आवरणात होते. टीमने या ४.४ अब्ज वर्ष जुन्या डोंगरात सोनं आढळलं नाही. पण त्यात टंगस्टन होतं. टंगस्टन आणि सोन्यात काही गोष्टी समान असतात. यातून त्यांनी निष्कर्ष काढला की, ग्रीनलॅंडच्या डोंगर हे दाखवतात की, पावसाआधी उल्कापिंडाचे तत्व होते. पृथ्वीवर उल्कापिंडाचा पाऊस साधारण ४.४ अब्ज ते ३.८ अब्ज वर्षाआधी झाला होता.
विलबोल्ड यांचा हा रिसर्च सप्टेंबर २०११ मध्ये नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता. ज्यात सोन्याची उत्पत्ती कशी झाली याबाबत सांगण्यात आले आहे. गेल्यावर्षी मेरीलॅंड विश्वविद्यालयातील एका टीमने आणि मथिउ तॉबॉलने रशियातील काही डोंगरांची टेस्ट केली. हे डोंगर ग्रीनलॅंडच्या डोंगरांपेक्षा नविन होते. हे केवळ २.८ अब्ज वर्ष जुने होते. यातून असं समोर आलं की, या डोंगरांमध्ये सोन्यासहीत लोखंडाचे अनेक धातू होते.
सोन्याच्या उत्पत्तीबाबत काही वैज्ञानिकांचं मत भलेही वेगळं असेल, पण विलबोल्ड यांच्यानुसार जास्तीत जास्त वैज्ञानिक ग्रीनलॅंडच्या डोंगरांवर करण्यात आलेल्या रिसर्चला आजही सर्वात विश्वसनीय मानतात. ते म्हणाले की, 'तुमचा अजूनही विश्वास बसणार नाही, पण आमची आकडेवारी फारच रोमांचक गोष्टी सांगतेय'.