रामपूर: सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या आणि त्यानंतर लिव्ह इनमध्ये राहत असताना गर्भवती राहिलेल्या प्रेयसीच्या लहान मुलाला अखेर वडिलांचं छत्र लाभलं आहे. प्रियकराचा शोध घेत घेत आसामहून उत्तर प्रदेशातल्या रामपूरमध्ये पोहोचलेल्या प्रेयसीचा निकाह तिच्या प्रियकरासोबत संपन्न झाला. मात्र प्रियकर आधीपासूनच विवाहित असल्यानं प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. त्यानंतर पोलिसांसमोरच दोघींनी पतीची वाटणी करून घेतली.
दोन्ही पत्नींना पती समान वेळ देईल आणि त्याचसोबत आई वडिलांचीदेखील काळजी घेईल असा अनोखा सामंजस्य करार पोलीस ठाण्यात झाला. हा प्रकार पाहून पोलीसदेखील चकित झाले. पतीला दोन्ही पत्नींना सारखाच वेळ देऊन त्यांच्यापासून झालेल्या मुलांची काळजी घ्यावी लागेल. यासोबतच तो आई वडिलांकडेही लक्ष देईल, असा निर्णय दोघींनी घेतला.
दोन्ही पत्नींनी पोलिसांसमोरच पतीची वाटणी केली. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी पती पहिल्या पत्नीसोबत असेल. गुरुवार, शुक्रवार, शनिवार तो दुसऱ्या पत्नीसोबत राहील आणि रविवारी आई वडिलांना वेळ देईल, अशा प्रकारची वाटणी पोलीस ठाण्यात करण्यात आली.
मूळचा अझीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोंकपुरी टांडाचा रहिवासी असलेला तकलीम अहमद नावाचा तरुण कामासाठी चंदिगढला गेला होता. दीड वर्षांपूर्वी त्याची फेसबुकच्या माध्यमातून आसामच्या तरुणीशी मैत्री झाली. पुढे ते दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर अहमदनं तिथून पळ काढला. त्याला शोधत तरुणी अझीमनमरमध्ये आली. तेव्हा तिला अहमद विवाहित असल्याचं समजलं. यानंतर तिचा अहमदसोबत निकाल लावण्यात आला.