अनेकांना जुन्या गोष्टींचं प्रचंड आकर्षण असतं. बऱ्याचदा सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही अशा गोष्टींना प्रचंड महत्त्व असतं. त्यामुळे त्यांचं मोलही खूप मोठं असतं. काही वेळा अशा गोष्टी वस्तू स्वरूपात असतात, तर काही वेळा प्रत्यक्ष जिवंत स्वरूपात.. दक्षिण आफ्रिकेत अशीच एक मगर आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा अनेक कारणांनी या मगरीला प्रचंड महत्त्व आहे. त्या देशातील लोक या मगरीला खूप मानतातही. ही मगरही आहे तशीच वैशिष्ट्यपूर्ण. पहिली गोष्ट म्हणजे या मगरीचं वय आहे तब्बल १२३ वर्षे ! जगातील ती सर्वांत वयोवृद्ध मगर आहे. १६ डिसेंबर १९०० मध्ये बोत्सवाना येथे या मगरीचा जन्म झाला होता. तिचा आकारही प्रचंड आहे. १६ फूट लांबीच्या या मगरीचं वजन आहे सातशे किलो!
नील ही जगातील सर्वात मोठी नदी. या नदीत या जातीच्या मगरी सापडतात. त्यामुळे त्यांना ‘नील मगर’ असंही म्हटलं जातं. या मगरीचं नाव आहे हेनरी. दक्षिण आफ्रिकेच्या एका प्राणिसंग्रहालयात या मगरीला ठेवण्यात आलं आहे. हेनरीची ही झाली सर्वसाधारण वैशिष्ट्य; पण या मगरीचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगातल्या सर्वांत वयोवृद्ध मगरीचा दर्जा तर तिला देण्यात आला आहेच; पण सहा मेटिंग पार्टनर्सपासून या मगरीला आजवर तब्बल दहा हजार पिल्लं झाली आहेत!
या मगरीचाही स्वत:चा असा एक इतिहास आहे. जन्माला आल्यानंतर काही काळातच म्हणजे सन १९००मध्ये या मगरीनं परिसरातील लहान मुलांवर हल्ले करायला सुरुवात केली. त्यामुळे या भागातील नागरिक घाबरले. आपल्या मुलांना बाहेर पाठवायलाही त्यांना भीती वाटू लागली. ही मगर कोणाला केव्हा गडप करेल याची काहीच शाश्वती नव्हती. त्याकाळी एक प्रसिद्ध शिकारी होते, त्यांचं नाव सर हेनरी न्यूमन. उत्कृष्ट शिकारी म्हणून तेव्हा त्यांचा प्रचंड दबदबा होता. या मगरीला ‘जिंदा या मुर्दा’ पकडण्याची जबाबदारी मग सर हेनरी यांच्यावर सोपवण्यात आली.
सर हेनरी यांनीही हे आव्हान स्वीकारलं. कितीही बडा शिकारी असो, ही मगर त्याचीही केव्हाही शिकार करेल, असंच सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळे ही जबाबादारी शिरावर घेण्यापासून सर हेनरी यांनाही अनेकांनी परावृत्त केलं; पण त्यांनी हे आव्हान स्वीकारलंच आणि १९०३मध्ये त्यांनी तिला पकडलं. पण या मगरीला मारायचं नाही, असा निर्णय सर हेनरी यांनी घेतला. त्यामुळे त्यांच्याच नावावरून या मगरीला हेनरी असंच नाव पडलं. तेव्हापासून या मगरीला प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आलं आहे.
तीस वर्षांपासून ही मगर दक्षिण आफ्रिकेच्या एका संवर्धन केंद्रात आहे. स्कॉटबर्ग या शहरातील क्रॉकवर्ल्ड संवर्धन केंद्रात तिची देखभाल केली जाते. नील जातीच्या या मगरी आफ्रिकेच्या तब्बल २६ देशांमध्ये आढळतात. पण हेनरी या मगरीचा स्वभाव काही वेगळाच. मुळात या नील मगरी अतिशय आक्रमक आणि रागीट स्वभावाच्या मानल्या जातात. त्यातही हेनरी जास्तच रागीट आणि आक्रमक होती. झेब्रा आणि साळिंदरसाखे प्राणी हे यांचं प्रमुख खाद्य मानलं जातं. हेनरी मात्र याबरोबर लहान मुलांनाही आपलं भक्ष्य बनवायची. त्यामुळे संपूर्ण परिसरात तिची प्रचंड दहशत पसरली होती.
आफ्रिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मगरीचं प्रमाण असंही खूप जास्त आहे. शिवाय या मगरी आक्रमक स्वभावाच्या असल्यामुळे त्यांच्या आसपास कोणीही आलं की लगेच त्या त्याचा खातमा करतात. त्यामुळे आफ्रिकेत दरवर्षी अक्षरश: शेकडो लोक मगरींच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतात. जगातील सर्वांत वयोवृद्ध मगर म्हणून हेनरीनं विक्रम केला असला, तरी जगातील सर्वांत लांब मगरीचा किताब मात्र ऑस्ट्रेलियाच्या कॅसियस या मगरीच्या नावे आहे. ही मगरदेखील हेनरीइतकीच १६ फूट लांब आहे, पण तिची लांबी हेनरीपेक्षा थोडी जास्त आहे. १९८४मध्ये क्विन्सलँड येथे जगातल्या या सर्वांत लांब मगरीला पकडण्यात आलं होतं. त्यानंतर २०११ मध्ये गिनेस बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या नावाची नोंद झाली होती. अनेक जण मात्र आजही हेनरीलाच जगातील सर्वाधिक लांबीची मगर म्हणून संबोधतात.
तिच्यावर सगळ्यांचा जीव!
हेनरी या मगरीचा सुरुवातीचा इतिहास थोडा कटु असला, ‘नरभक्षक’ म्हणून ती ओळखली जात असली तरी आता मात्र या मगरीविषयी अनेकांना आपुलकी आहे. ज्या प्राणिसंग्रहालयात तिला ठेवण्यात आलं आहे, तिथले कर्मचारी हेनरीची खूप मनापासून काळजी घेतात. हेनरीही आता बऱ्यापैकी माणसाळली आहे. हेनरीला पाहण्यासाठी परदेशातूनही नागरिक येत असतात. त्यात अर्थातच लहान मुलांचा सहभागही खूपच जास्त आहे.