चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून रिंगण करून फिरणाऱ्या मेंढ्यांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे अनेकांनी ही नव्या संकटाची चाहूल आहे अशी शक्यता वर्तवली होती. तर काहींनी भलतेच तर्क लावले होते. पण आता याच कारण समोर आलं आहे. एका वैज्ञानिकाने याबाबत मोठा दावा केला आहे. चीनमध्ये एकाच जागी 12 दिवस फिरणाऱ्या मेंढ्यांचं रहस्य उलगडल्याचा दावा इंग्लंडमधील प्राध्यापक मॅट बेल यांनी केला आहे.
मेंढ्यांना बराच वेळ एका गोठ्यात बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची दैनंदिन वर्तणूक बदलली. म्हणजेच त्यांच्या सवयीत बदल झाल्याचं बेल यांनी सांगितलं. गोल गोल फिरणाऱ्या मेंढ्यांचा व्हिडीओ जगभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या पीपल्स डेलीनं हा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. ही घटना मंगोलियात घडली होती. जगभरात नंतर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मेंढ्यांचं वर्तन एक सारखचं आहे. याचं विश्लेषण इंग्लंडच्या हार्टपुरी विद्यापीठाचे प्राध्यापक मॅट बेल यांनी केलं. मेंढ्यांना बरेच दिवस एका गोठ्यात ठेवण्यात आलं होतं. त्यांना फार लांबवर जाण्याची परवानगी नव्हती. मर्यादित जागेतच त्यांना राहावं लागत होतं. यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला. त्यांच्यात आलेली निराशा अशा पद्धतीतून दिसून आल्याचं बेल म्हणाले. मेंढ्या या कळपात वावरतात. कळपाची एक मानसिकता असते.
मेंढ्या कायम कळपात वावरत असतात. शत्रूंपासून एकमेकांचं संरक्षण करतात. ती त्यांची मानसिकता आणि सवय असल्याचं बेल यांनी म्हटलं. मेंढ्यांच्या मालकीण असलेल्या मिस मियाओ यांनी सुरुवातीला काही मेंढ्याचं गोल गोल फिरत होत्या. मात्र त्यानंतर संपूर्ण कळपच रिंगण करून फिरू लागल्याचं सांगितलं. मेंढ्यांना 34 गोठ्यांमध्ये ठेवण्यात आलं होतं. यातील एका गोठ्यातील एक मेंढी गोल गोल फिरू लागली. त्यानंतर तिच्या गोठ्यातील इतर मेंढ्यादेखील तिचं अनुकरण करू लागल्या असं मियाओ यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.