(Image Credit : dailymail.co.uk)
मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एलेक्सा टेरेसस नावाची एक तरूणी घराच्या बाल्कनीमध्ये योग करत होती. दरम्यान ८० फूट उंचीवरून ती घसरून खाली पडली. एलेक्सा एक्सट्रीम योगाभ्यास करत होती. २३ वर्षीय एलेक्साची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
'डेली मेल' ने दिलेल्या वृत्तानुसार, एलेक्सा सहाव्या मजल्यावर घराच्या बाल्कनीमध्ये योगाभ्यास करत होती. ती योगाभ्यास करतानाचा एक फोटो समोर आला असून ज्यात ती बाल्कनीतील कठड्यावर उलटी लटकलेली दिसत आहे. यात एलेक्साने तिचं सगळं वजन कठड्यावर दिलं आहे. हे करत असताना ती ८० फुटावरून खाली रस्त्यावर पडली.
(Image Credit : dailymail.co.uk)
ही घटना गेल्या शनिवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी घडली. त्यानंतर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. असे सांगितले जात आहे की, एलेक्साची ११ तास सर्जरी करण्यात आली. सोमवारी सायंकाळी मेडिकल रिपोर्टमध्ये तिची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. एलेक्साच्या हात आणि पायात अनेक फ्रॅक्टर्स आले आहेत. त्यासोबतच कंबरेला आणि डोक्यालाही जखमा झाल्या आहेत.
(Image Credit : dailymail.co.uk)
एलेक्साचं भरपूर रक्त वाहून गेल्यामुळे तिला रक्ताची गरज होती. अशात तिच्या कुटुंबियांनी फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आवाहन केले होते. डॉक्टरांनी सांगितले की, एलेक्सा पुढील तीन वर्ष चालू शकणार नाही. दुसरीकडे तिच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, एलेक्सा नेहमीच बाल्कनीच्या किनाऱ्यावर उभी राहून विचित्र योग मुद्रा करत होती.