Burglar Used Pigeons to Rob : चोरीच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. यातील अनेक चोरींच्या पद्धतींवर विश्वासही बसत नाही. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय आहे. बंगळुरूमध्ये एका व्यक्तीने ५० पेक्षा जास्त घरांमध्ये चोरी केली. त्याची चोरी करण्याची पद्धत इतकी हैराण करणारी होती की, कुणी त्याचा विचारही केला नसेल. ३० वर्षीय मंजूनाथ उर्फ परिवाला कबुतरांच्या मदतीने चोरी करत होता. असं सांगण्यात आलं की, तो केवळ अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घरांमध्येच चोरी करत होता. पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली आहे.
कबुतरांच्या मदतीने चोरी
बंगळुरूच्या हसौरमध्ये राहणारा मंजूनाथ चोरी करण्याआधी कबुतरांच्या मदतीने घरांनी माहिती घेत होता. नंतर चोरी करत होता. कबुतरांच्या मदतीने चोरी करत असल्याने आजपर्यंत तो पकडला गेला नव्हता. तो आधी एक किंवा दोन कबूतर बिल्डींगच्या आजूबाजूला सोडत होता. हे पक्षी कोणत्याही बाल्कनीमध्ये जाऊन बसत होते. जेव्हा लोक त्याची विचारपूस करत होते तेव्हा म्हणायचा की, तो केवळ त्याचे कबूतर घेण्यासाठी आलाय. ही पद्धत वापरून तो लोकांचं लक्ष विचलित करत होता. हुशारीने बिल्डींगच्या परिसरात शिरत होता.
कशी केली चोरी?
यादरम्यान जशी त्याला एखाद्या बंद घराची माहिती मिळत होती, तसा तो चोरीचं प्लॅनिंग करत होता. दार उघडण्यासाठी तो लोखंडाच्या रॉडचा वापर करत होता. इतकंच नाही तर घरातील कपाट किंवा कॅबिनेट उघडण्यासाठीही तो याचाच वापर करत होता. तो इतका हुशारीने हे सगळं करत होता की, त्याच्यावर कुणाला संशयही येत नव्हता. पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे.
'परिवाला मांजा' च्या घटनेमुळे पुन्हा एकदा हे समोर आलं की, गुन्हेगार चोरी करण्यासाठी नवनवीन आयडियांचा वापर करतात. हा गुन्हेगार जास्तकरून सोन्याचे दागिने, कॅशवर हात साफ करत होता. त्यानंतर तो ते बाजारात विकत होता. मंजूनाथला याआधी अनेकदा अटक झाली आहे. पण पुन्हा बाहेर येऊन तो तेच काम करायचा. महत्वाची बाब म्हणजे तो एकटाच कबुतरांच्या मदतीने चोऱ्या करत होता.