कराची - मध्यंतरी पाकिस्तानमधील एका चिमुकलीची मान १८० अंश डिग्रीमध्ये फिरत असल्याची माहिती समोर आली होती. तिला मस्क्युलर डिसऑर्डर झाल्याने तिची मान १८० अंश डिग्रीत असल्याचं सांगण्यात आलं होतं. आताही असाच एक प्रकार पाकिस्तानमधून समोर आलाय. एक तरुण आपली मान जवळपास १८० अंश डिग्रीत वळवू शकतो. त्यानेच याबाबतचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केलाय. केवळ मानच नव्हे तर तो त्याचे हात-पायही लवचिकतेचा वापर करून फिरवू शकतोय.
पाकिस्तानमधील कराची येथे राहणारा मोहम्मद समीर हा अवघा १४ वर्षांचा अवलिया. एकदा लहानपणी एका हॉरर चित्रपटात त्याने एका हिरोला अशीच मान वळवताना पाहिलं होतं. तेव्हापासून तो असे प्रयोग करू लागला. त्याच्या या कलेच्या गुणावर त्याला हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे. मात्र सध्या तरी तो डान्स ग्रुपमध्ये आपली कला सादर करून समाधान मानतोय. या कलेसाठी त्याने शाळाही सोडल्याचं सांगण्यात येतंय. पण त्याला आशा आहे की, त्याच्या लवचिकतेच्या जोरावर त्याला एखादा चित्रपट नक्कीच मिळेल.
सुरुवातीला असे प्रयोग करताना त्याची आई त्याला फार मारायची. मान, हात-पाय वळवताना काही दुखापत झाली तर ती जीवावर बेतू शकते असं त्याच्या आईला वाटायचं. खरंतर असं घडूही शकलं असतं. मात्र मोहम्मदकडे असलेली कलाच त्याला यातून बाहेर काढू शकली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरही बराच व्हायरल झालाय. सोशल मीडियावर तर त्याला ह्युमन आऊल असंही नाव पडलंय.
त्याचे वडिल आजारी असतात. त्यामुळे त्याच्या कुटूंबाची संपूर्ण मदार मोहम्मदवरच आहे. म्हणूनच त्याने शाळेलाही रामराम ठोकला. आपल्या कलेच्या जीवावर आणि डान्सग्रुपच्या मार्फत त्याला थोडेफार पैसे मिळतात आणि त्यावरच त्याचं संपूर्ण घर चालतंय. मोहम्मदच्या या कलेतून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की, कला कोणतीही असो, त्यातून सातत्य ठेवल्यास आपण नक्कीच यशस्वी होतो. मोहम्मदने हॉलिवूडची स्वप्ने पाहिली आहेत. हा व्हिडिओ एवढा व्हायरल झालाय की एखाद्या हॉलिवूडच्या निर्मात्यापर्यंत पोहोचला की त्यालाही हॉलिवूडमधून ऑफर येण्याची शक्यता आहे.
सौजन्य - www.dailymail.co.uk