गुजरातच्या अहमदाबादमधून एक अवाक् करणारी घटना समोर आली आहे. घटना समोर आल्यावर एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे असल्यासारखी वाटत आहे. एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर आपला मुलगा समजून त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र, काही दिवसांनी त्यांचा बेपत्ता मुलगा जिवंत घरी परतला. त्याच्या जिवंत असण्याने तर सगळ्यांना धक्का दिलाच आहे. सोबतच हा प्रश्न उपस्थित झाला आहे की, ज्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती व्यक्ती कोण होती?
मुलाने सोडलं होतं घर
न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, परिवारातील मुलगा ब्रिजेशने आर्थिक तंगीला कंटाळून २६ ऑक्टोबर आईकडून ३ हजार रूपये घेऊन घर सोडलं होतं. कामावर जात असल्याचं त्याने सांगितलं होतं. पण तो परतला नाही. आईने त्याला अनेकदा फोन केले, पण त्याने काही उत्तर दिले नाही. ब्रिजेशचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा काही पत्ता लागला नाही. अशात कुटुंबियांनी पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
मृतदेह आणि अंत्यसंस्कार
नोव्हेंबरच्या सकाळी साबरमती नदीमध्ये एका अज्ञात तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी १० नोव्हेंबरला ब्रिजेशच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवलं होतं. कुटुंबियांना तो मृतदेह त्यांच्याच मुलाचा म्हणजे ब्रिजेशचा वाटला. ते मृतदेह गावी घेऊन गेले आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांना वाटलं त्यांनी मुलगा गमावला. अशात त्यांनी अंत्यसंस्कारानंतर सगळे रितीरिवाज पार पाडले.
ब्रिजेश परत आला आणि...
दरम्यान ब्रिजेशकडील सगळे पैसे संपले होते. अशात त्याने एका व्यक्तीच्या फोनवर मित्राला फोन लावला. त्याने मित्राला सांगितलं की, तो हरिद्वारला जाऊन साधू बनणार आहे. सध्या तो भुजमध्ये आईसोबत राहत आहे. त्याने मित्राकडे काही उधार पैसे मागितले. ज्यामुळे मित्राला त्याच्यावर संशय आला. मित्र लगेच ब्रिजेशच्या घरी गेला आणि परिवारातील लोकांना हे सगळं सांगितलं. कुटुंबियांनी ब्रिजेशला शोधून काढलं. मुलगा जिवंत असल्याचं पाहून सगळेच हैराण झाले. घरात आनंदाचं वातावरण तयार झालं.
मृतदेह कुणाचा?
या घटनेमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. परिवाराने ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले ती व्यक्ती कोण होती? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.