ऑनलाइन लोकमतपश्चिम बंगाल, दि. 26 - माल्दा जिल्ह्यात सर्वधर्मसमभावाचं एक अनोखं उदाहरण हिंदू आणि मुस्लिमांनी घालून दिलं आहे. धर्माच्या पार जात काही मुस्लिमांनी हिंदूच्या पार्थिवाला खांदा दिला आहे. स्वतःचा धर्म बाजूला ठेवत या तरुणांनी नवा आदर्श घालून दिला आहे. विश्वजित रजक नामक व्यक्तीचा यकृताच्या कर्करोगाने ग्रासलं असल्यानं सोमवारी मृत्यू ओढावला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कुटुंबीयांना त्याच्यावर अंत्यविधी करणं कठीण होतं. गावातल्या काही मुस्लिम तरुणांना हे कळलं आणि त्यांनी रजक कुटुंबीयांना तातडीची मदत केली. विश्वजितच्या कुटुंबीयांसह त्याच्या वडिलांच्या सहमतीनं त्या मुस्लिम तरुणांनीच त्याच्या पार्थिवाला खांदा दिला. मुस्लिम तरुणांनी गावापासून 8 किलोमीटर दूरवर असलेल्या मनिकचक स्मशानभूमीपर्यंत पार्थिवाला पायी नेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. विश्वजितवर अंत्यविधी करण्यासाठी गावकऱ्यांनी एकजूट होत पैसेही गोळा केले होते. "राम नाम सत्य है" म्हणत या मुस्लिम तरुणांनी विश्वजितला खांदा देत अखेरचा निरोप दिला. विशेष म्हणजे गावातल्या मशिदीचे मौलवीही यावेळी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी उपस्थित होते. सर्व पारंपरिक हिंदू विधी पार पाडल्यानंतर त्याच्या अस्थींचे नदीत विसर्जन करण्यात आले. या अंतयात्रेत तृणमूल नेता आणि माल्दा जिल्हा परिषदेचे तृणमूलचे उपाध्यक्ष गौरचंद्र मंडलही उपस्थित होते. तृणमूल नेता मंडल म्हणाले, मी निःशब्द झालो आहे. भयंकर गरिबी असतानाही हे गाव म्हणजे सामाजिक एकतेचं जिवंत उदाहरण आहे. तसेच गावातील मुस्लिम तरुण अश्रफ म्हणाला, हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही मुलांसारखेच आहेत. आम्ही इथे नेहमीच एक-दुस-यांची काळजी घेतो. कारण आम्ही सर्वात आधी एक मनुष्य आहोत.
हिंदूच्या पार्थिवाला मुस्लिमांनी दिला खांदा
By admin | Published: April 26, 2017 6:54 PM