चप्पल किंवा बूट जुने झाले की आपण ते टाकून देतो आणि नवे घेतो. एका रिपोर्टनुसार दरवर्षी जगभरात तब्बल ३५ अब्ज चपला व बुटं कचऱ्यात टाकून देण्यात येतात. तर १.५ अब्ज लोक आजही अनवाणी फिरतात. आर्थिक तंगीमुळे अशा लोकांना नवी चप्पल घेणं परवडत नाही.
राजस्थानच्या श्रीयांश भंडारी आणि उत्तराखंडच्या रमेश धामी या दोन हरहुन्नरी तरुणांनी या समस्येवर तोगडा काढण्यासाठी नामी शक्कल लवढली आहे. या दोन मित्रांनी जुन्या चपला आणि बुटांवर काम करुन त्या नव्या बनवण्यास सुरुवात केली. आता त्यांनी तयार केलेल्या चपला आणि बुटांना संपूर्ण देशभरात मागणी आहे. अनेक मोठ्या कंपन्यांसाठीह देखील ते बुटं तयार करतात. यातून दरवर्षी जवळपास ३ कोटींचा व्यवसाय दोघं करत आहेत. याशिवाय गरिबांना मोफत चप्पल आणि बुटं वाटपाचंही मोहिम त्यांनी हाती घेतली आहे.
कल्पना कशी सुचली?२६ वर्षीय श्रीयांश हा राजस्थानच्या उदयपूरचा रहिवासी आहे. तो राज्यस्तरीय खेळाडू देखील राहिला आहे. तर रमेश हा मूळचा उत्तराखंडच्या गढवाल जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोघांची मुंबईत एका मॅरेथॉनच्या ट्रेनिंगच्या निमित्तानं भेट झाली होती.
२०१५ साल श्रीयांश मुंबईतील जय हिंद कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेत होता. एकदा मॅरेथॉनच्या सरावावेळी रमेशचे फाटलेले बुट त्यानं पाहिले. पण त्यावर काम करुन ते वापरण्यायोग्य बनवलेले होते. श्रीयांशला रमेशची कल्पना खूप आवडली. खेळाडूंची बुटं ही खूप महाग असतात आणि ती लवकर खराब देखील होतात. त्यामुळे ती वारंवार बदलावी किंवा नवी घ्यावी लागतात. पण या बुटांना पुन्हा वापरण्यायोग्य केलं तर पैशांची बचत होईल.
याच उद्देशानं श्रीयांश आणि रमेश यांनी काम करण्यास सुरुवात केली. दोघांनी मिळून काही जुन्या बुटांवर काम केलं आणि ते वापरण्यायोग्य केले. या बुटांचं प्रदर्शन त्यांनी अहमदाबाद येथे आयोजित एका प्रदर्शन कार्यक्रमात केलं. दोघांचं नशीब इतकं भारी होतं की त्यांनी सादर केलेल्या सॅम्पलची निवड झाली. त्यानंतर श्रीयांश आणि रमेश यांना वाटलं की हे काम आता पुढे न्यायला हवं. दोघांनी मुबंईतील ठक्कर बप्पा कॉलनीमध्ये एक बुटं बनविणाऱ्या छोट्या युनिटसोबत करार केला. त्यांच्याकडून आपल्याला हवे तसे नवे सॅम्पल तयार करुन घेतले आणि त्यानंतर दोन स्पर्धा त्यांनी जिंकल्या. यातून ५ लाख रुपयांचं भांडवल उभारलं.
दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये दोघांच्या कामाची दखल घेण्यात आली होती. त्यामुळे श्रीयांशच्या कुटुंबीयांनीही दोघांना पाठिंबा दिला आणि ५ लाख रुपयांची मदत केली. अशापद्धतीनं दोघांनी १० लाखांच्या भांडवलावर आपला नवा व्यवसाय सुरू केला. दोघांनी 'ग्रान सोल' नावाच्या कंपनी सुरू केली. त्यासाठी एक कार्यालय, काही कर्मचारी आणि काही प्रोटोटाइप खरेदी केले.
दोघांनी सुरुवातीला स्पोर्ट्स ग्राऊंडवर जाऊन खेळाडूंची जुनी बुटं गोळा करायला सुरुवात केली. त्यांच्यावर काम करुन ते नवे केले. मग ते वेगवेगळ्या शहरातील लोकांना पाठविण्याचं काम त्यांनी हाती घेतलं. हळूहळू अनेक प्रदर्शन कार्यक्रमांमध्ये ते भाग घेऊ लागले आणि तिथं त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला.
४ लाखांहून अधिक जुन्या बुटांवर केलं काम'ग्रीन सोल' कंपनीनं आतापर्यंत ४ लाखांहून अधिक जुन्या बुटांवर काम करुन ते नवे केले आहेत आणि दरवर्षी यात वाढ होत आहे, असं श्रीयांशनं सांगितलं. अनेक मोठ्या कंपन्या श्रीयांश आणि रमेश यांना स्पॉन्सरशीप देखील देऊ लागल्या आहेत.
इतकंच नव्हे, तर अनेक बुटं तयार करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्यांसोबत त्यांनी करार केला आहे. मोठ्या कंपन्या त्यांना त्यांच्याकडील जुने आणि खराब झालेली बुटं त्यांना देतात. त्यावर काम करुन ते नवे केले जातात. त्यावर प्रत्येकी २०० रुपयांची कमाई ग्रीन सोल कंपनीकडून केली जाते.