मुंबई : त्या दिवशी रात्री मालवणीत अनेकांनी मिथेनॉलमिश्रित विषारी दारूचे घोट घेतले होते. या भीषण दारूकांडाने १०४ बळी घेतलेच पण रात्रीच्या दारूचा हँग ओव्हर असल्याने याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक मद्यपींना आपली दृष्टी गमवावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी अनेक मद्यपींना अंधूक दिसणे, डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. मात्र रात्रीच्या दारूचे नेहमीप्रमाणे हँग ओव्हर असेल असे समजून अनेक मद्यपींनी त्याकडे दुर्लक्ष केले. डोळ्यांचा त्रास जाणवल्यावर वेळेत उपचार केले असते तर काहींची दृष्टी वाचू शकली असती, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना सांगितले. जास्त काही त्रास होणार नाही, जाऊ दे म्हणून दुर्लक्ष केल्यामुळेच अनेकांना दृष्टी गमवावी लागली.मिथेनॉल हा एक विषारी पदार्थ आहे. मिथेनॉल केमिकलचा डोळ्यांच्या नसांवर सर्वांत आधी परिणाम होऊ लागतो. मिथेनॉल प्राशन केलेल्या व्यक्तीला ४८ तासांत उपचार मिळाल्यास त्याची दृष्टी वाचवता येऊ शकते. मात्र यापेक्षाही जास्त उशीर झाल्यास दृष्टी वाचवणे शक्य होत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या मालवणीतील काही मद्यपींना दृष्टिदोष निर्माण झाला आहे. तर काहींनी दृष्टी गमावली असून याचा नेमका आकडा पालिकेकडून जाहीर करण्यात आलेला नाही. या सर्वांची डोळ्यांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान दारुकांडातील रुग्णालयात दाखल असलेल्या किती जणांच्या दृष्टीला हानी झाली, याची माहिती घेतली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हँग ओव्हरच्या नादात दृष्टी गेली
By admin | Published: June 27, 2015 1:38 AM