कॅनडामध्ये शिख पुरूषांच्या एका समूहाने धबधब्याजवळ अडकलेल्या दोन प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी धार्मिक मान्यतेला बाजूला ठेवत माणुसकीचं उदाहरण दिलं आहे. ग्लोबल न्यूजच्या रिपोर्टनुसार, कुलजिंदर किंडा ब्रिटीश कोलंबियाच्या गोल्डन एर्स प्रोविंशिअल पार्कमध्ये चार मित्रांसोबत पायी यात्रा करत होते. तेव्हा त्यांना दोन व्यक्ती भेटले. जे एका डोंगरावरून घसरून धबधब्या खाली एका पूलावर पडले होते. किंडा आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या पगडीने एक दोरी तयार केली. त्याद्वारे त्या दोघांचा जीव वाचवण्यात आला. सोशल मीडियावरून त्यांचं कौतुक केलं जात आहे.
किंडा यांनी हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर शेअर केल्यावर या घटनेचं फुटेज व्हायरल झालं आहे. त्यांनी एनबीसी न्यूजला सांगितलं की, फसलेल्या लोकांनी त्यांना आधी इमरजन्सी सेवेला फोन करण्यास सांगितलं. जे ते करू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे सेलफोन सेवा नव्हती. त्यांनी मदतीसाठी शोध घेतला. काही सापडलं नाही तर त्यांनी त्यांच्या पगडी काढल्या.
किंडा म्हणाले की, 'आम्ही याचाच विचार करत होतो की, त्यांना बाहेर कसं काढता येईल. पण हे माहीत नव्हतं की, त्यांना कसं बाहेर काढावं. त्यामुळे मदत मिळवण्यासाठी आम्ही १० मिनिटे फिरलो. त्यानंतर आम्ही पगडी काढून एकत्र बांधण्याचा विचार केला'.