शिलाँग- म्हण, थोडसं गाणं असा आग्रह करकरूनही गाणं न म्हणणाऱ्या, लाजणाऱ्या मुली किंवा पुरुष तुम्ही पाहिले असतील. गाणं हे प्रत्येकाचं काम नाही असं आपण धरुन चाललेलो असतो. पण मेघालयातलं एक गाव मात्र एकदम वेगळं आहे. डोंगरदऱ्यांच्या आणि जंगलाच्या कोंदणात वसलेल्या कोंगथाँग या खेड्याजवळ जाताच गाण्यांचे आवाज येऊ लागतात. हे आवाज काही पक्ष्यांनी केलेल कूजन नसते तर ते गावातील लोकांचेच आवाज असतात. या गावात जन्मलेल्या प्रत्येकाला नामकरणाबरोबर स्वत:ची एक धूनही मिळते. लोकही ही धून गाऊनच त्या व्यक्तीला हाक मारतात. हे सर्व लोक खासी जमातीचे आहेत. एकदा मिळालेली धून नावाप्रमाणेच आयुष्यभर वापरली जाते. बालपणी या 'धुनीकरणा'बरोबर नामकरण झालेले असले तरी प्रत्यक्ष नावाचा फारसा उपयोग गावामध्ये तसा फारसा केला जात नाहीच.
या गावामधून तुम्ही नुसता एक फेरफटका मारला तरी असे आवाज झोपड्यांमधून येऊ लागतात. एखादी आई आपल्या मुलाला जेवणासाठी हाक मारत असो वा खेळणारी मुले एकमेकांशी बोलत असोत सर्वजण या सांगितिक भाषेतच संवाद साधताना पाहायला मिळतील. ही सगळी संगीतधून निर्माण करण्याची प्रक्रीया अगदी हृदयापासून सुरु होते असं मत पींडाप्लीन नावाच्या बाई सांगतात. त्यांना तीन मुले असून तिन्ही मुलांशी त्या अशाच संगीतमय भाषेत संवाद साधतात. त्या ३१ वर्षांच्या असून आपल्या मुलांशी असा संवाद साधताना प्रेम व्यक्त केले जाते असे त्यांना वाटते. या गावातील समुदायाचे प्रमुख रॉथेल खोन्गसित या संगितभाषेबद्दल स्वत:चा अनुभव सांगताना म्हणतात, जर माझ्या मुलाने काही चूक केली किंवा त्रास दिला तर मात्र मी रागे भरून त्याला त्याच्या खºया नावाने हाक मारतो. तेव्हा मी प्रेमळ सांगितीक भाषेत बोलत नाही.कोंगथाँग खेडं गेली अनेक शतके उर्वरित जगापासून अलिप्त राहिलं आहे. तेथे जाण्यासाठी भरपूर तासांचे ट्रेकिंग करावे लागते. या गावात २००० साली वीज आली आणि साधा मातीचा रस्ताच मुळी २०१३ साली तयार झाला. दिवसभर गावातील लोक जंगलामध्ये गवत आणि इतर वस्तू गोळा करण्यासाठी जातात त्यामुळं गावात फक्त मुलंच राहातात. जंगलामध्ये लांबलांब असणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुमारे ३० सेंकदांची धून या लोकांना उपयोगी पडते. आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहातो. जशी पक्ष्यांना , प्राण्यांना स्वत:ची ओळख असते, ते एकमेकांशी विशिष्टप्रकारे संवाद साधतात तसेच आम्हीही साधतो, असे खोन्गसित सांगतात.या प्रथेला जिंगरवाइ लावबेई असे म्हणतात. त्याचा अर्थ आदिमातेचं गाणं असा होतो. खासी जमातीच्या दंतकथांमध्ये आदिमातेचा उल्लेख आहे.