परिस्थिती माणसाला काय करायला लावेल सांगता येत नाही. मात्र, काही लोक कोणत्याही परिस्थितीत जगण्याची धमक ठेवतात. परिस्थितीचा सामना करतात. जगण्यासाठी लढणं हेच जीवन आहे. सावित्रीचंही तसंच आहे. ती ३३ वर्षांची आहे. तिच्याकडे कमाईचं दुसरं साधन नव्हतं म्हणून ती ताडाच्या झाडावर चढून ताडी काढते आणि आपल्या पोरीचा सांभाळ करते.
सावित्री तेलंगणातील रेगोडे गावातील राहणारी आहे. तिचा पती हेच काम करत होता. मात्र, कार्डियाक अरेस्टमुळे त्याचं निधन झालं. मीडिया रिपोर्टनुसार, २०१६ मध्ये तिच्या पतीचं निधन झालं. त्यावेळी सावित्री गर्भवती होती. तिने एका मुलीला जन्म दिला.
सावित्रीचं १०वी पर्यंतचं शिक्षण झालं आहे. तिला नोकरीही मिळाली असती. पण तिला तिच्या पतीचं खानदानी काम करायचं आहे. ती सांगते की, 'देवाने आम्हाला शिक्षा दिली आहे. आधी माझा पती गमावला. नंतर मला मुलगी झाली. तिलाही औषधांची गरज पडते. मला तिच्यासाठी पैसे कमवावे लागतील'.
सावित्रीने सांगितले की, 'आधी मला या कामासाठी लायसेन्स मिळत नव्हतं. मात्र माझी इच्छाशक्ती आणि मेहनतीमुळे मला लायसेन्स देण्यात आलं. मी सहजपणे ३० फूटाचं झाड चढू शकते'. तिने हेही सांगितलं की, रोज ती ३० झाडांवर चढते. इतकंच नाही तर तिला हे काम करण्यासाठी १० किलोमीटर रोज चालावं लागतं.
गेल्यावर्षीही शेजाची कहाणी समोर आली होती. ती सुद्धा एक तोडी टॅपर आहे. ती सुद्धा २६ फूट उंचीच्या झाडावर चढून हे काम करते. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, तिने सांगितले होते की, 'आधी मी छोट्या झाडांवर चढत होते. हळूहळू उंच झाडांवर चढू लागले. आज मी रोज १० झाडांवर चढते. दिवसाला मी ३५० रूपये कमावते. जर मी काम केलं नाही तर हे पैसेही येणार नाही'. खरंच या महिलांनी हे दाखवून दिलं की, परिस्थितीशी दोन हात करणे यांच्याकडून शिकावे.