Smart Toilet Fire : टेक्नॉलॉजीचा आज आपल्या जीवनावर किती प्रभाव आहे हे पदोपदी बघायला मिळतं. टेक्नॉलॉजी आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग झाली आहे. ती पूर्णपणे टाळाताही येत नाही आणि पूर्णपणे स्वीकारताही येत नाही. कधी कधी तर टेक्नॉलॉजीमुळे अनेकदा आपलं नुकसानही होतं. अशा अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पण आता जी ताजी घटना समोर आली आहे ती वाचून धक्का बसेल.
स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फोन आणि अनेक स्मार्ट वस्तूंसोबत आता बाजारात स्मार्ट टॉयलेटचंही चलन वाढलं आहे. एक व्यक्ती या स्मार्ट टॉयलेटचा वापर करत होती. तेव्हा त्याच्यासोबत एक भयावह दुर्घटना घडली. अशी की, तो ती आयुष्यभर विसरणार नाही. यांग्त्ज़ी इवनिंग न्यूजमध्ये नुकतीच फुजियान प्रांतातील या व्यक्तीची कहाणी सांगण्यात आली.
ही व्यक्ती जेव्हा टॉयलेट यूज करत होती तेव्हाच शॉर्ट सर्किट झालं आणि टॉयलेटच्या पॉटमध्ये आग लागली. ही आग बरीच मोठी होती. व्यक्तीने कसातरी आपला जीव वाचवला आणि पॉटमधील आगीचे व्हिडीओ व फोटो काढले. ही घटना 10 नोव्हेंबरला घडली. व्यक्तीने सांगितलं की, टॉयलेट यूज करताना सगळ्यात आधी त्याला धुराचा वास आला, मग पॉटमधून पांढरा धूर येताना दिसला व शेवटी तो खडबडून उठला तेव्हा त्याला दिसलं की, पॉटमधून आगीचे लोळ येत आहेत.
या घटनेचं मूळ कारण समोर आलं नाही. पण व्यक्तीला संशय आहे की, शॉर्ट सर्किटमुळे यात आग लागली असावी. गेल्यावर्षी ऑगस्टमध्येही अशीच एक घटना चीनमधून समोर आली होती. एका व्यक्तीला झोपेत धुराचा वास आला. त्याने टॉयलेटमध्ये जाऊन पाहिलं तर स्मार्ट टॉयलेटमध्ये आग लागली होती.