जगात शाही दागदागिने आणि मौल्यवान रत्नांची काही कमतरता नाही. गेल्याच आठवड्यात जिनेव्हात रशियाचे शेवटचे सम्राट निकोलस द्वितीय यांच्या कुटुंबाशी नातं असलेल्या खास दागिन्यांचा लिलाव झाला. १९१७ सालच्या क्रांती लढ्यात रशियातून बाहेर नेण्यात आलेल्या ब्रोच आणि इअररिंग्स ८,८३,६४१ डॉलरला (जवळपास ६,५७,६१,००० रुपये) विकले गेले आहेत. पण हे ब्रोच आणि इअररिंग्ज रशियाबाहेर जाण्याची कहाणी देखील अतिशय रंजक आहे. निकालोस द्वितीय यांची काकी ग्रँड डचेस मारिया पावलोवना यांचे हे दागिने असल्याचं सांगितल जातं. रशियातून पळ काढण्याआधी त्यांनी आपल्या एका मित्राच्या हातून २०० हून अधिक शाही दागिने बाहेर पाठवून दिले होते.
वृत्तपत्रात लपेटून दागिने वाचवले गेलेपावलोवना या सेंट पीटर्सबर्गच्या राणी होत्या आणि त्यांना दागदागिन्यांची प्रचंड आवड होती. १९१७ सालात तेव्हा रशियात स्वातंत्र्य संग्राम सुरू होता. त्यावेळी शाही खजान्यांवर हल्ले करण्यात आले होते पावलोवना देखील शाही कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे रशिया सोडून जाण्याच्या विचारात होत्या. पण परिस्थिती इतकी कठीण होऊन बसली होती की त्यांनी त्यांचा मित्र आणि ब्रिटिश डिप्लोमॅट अल्बर्ट हेन्री स्टॉपफर्डकडे हे काम सोपवलं. रॉयटर्सच्या वृत्तानुसार स्टॉपफर्डनं राणी पावलोवना यांना ३६० खोल्या असलेल्या एक महालात पाठवलं होतं. तर पावलोवना यांचा मोठा मुलगा बोरिस यांनी दरवाजाच्या खालून दागदागिनं स्टॉपफर्डपर्यंत पोहोचवले होते.
स्टॉपफर्डनं दागदागिन्यांचं वर्गीकरण केलं. त्यानंतर त्याचे तुकडे करुन ते एका वृत्तपत्रात लपेटले. दागिन्यांचे एकूण २४४ तुकडे करुन स्टॉपफर्ड ते लंडनला घेऊन रवाना झाला आणि ते एका बँकेत जमा केले होते. पावलोवना १९१९ साली रशियातून पळ काढण्यास यशस्वी ठरल्या पण पुढच्याच वर्षी फ्रान्समध्ये त्यांचं निधन झालं. दागदागिने त्यांची मुलगी व ग्रीस, डेन्मार्कची राजकुमारी एलेना यांना देण्यात आले होते. एलेना यांच्या कुटुंबीयांकडेच दागिन्यांची कस्टडी राहिली. त्यानंतर कालांतरानं दागिन्यांच्या एक एक तुकड्यांचा लिलाव करण्यात आला.