जाजपूर: ओदिशातल्या जाजपूर जिल्ह्यात एक अजब प्रकार घडला आहे. एका व्यक्तीला सापानं दंश केला. त्याचा बदला घेण्यासाठी संबंधित व्यक्ती सापाला चावला. यानंतर सापाचा मृत्यू झाला. सध्या या घटनेची परिसरात सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे सर्पदंशानंतरही माणूस जिवंत राहिला. पण त्याच माणसानं चावा घेतल्यानं सापाचा मृत्यू झाला.
जाजपूरमधल्या दानागढी परिसरात किशोर बद्रा नावाच्या एका व्यक्तीला सापानं दंश केला. बुधवारी रात्री शेतातून परतत असताना हा प्रकार घडला. साप किशोर यांच्या पायाला चावला. किशोर बद्रा यांना सापाचा राग आला. त्यांचा पारा चढला. त्यांनी दंश करणाऱ्या सापाला पकडलं आणि त्याचा चावा घेतला.
'रात्री घराकडे परतत असताना माझ्या पायाला काहीतरी चावल्यासारखं जाणवलं. मी हातातला टॉर्च घेऊन पाहिलं तर साप माझ्या पायाजवळ होता. मी सापाला हातानं पकडलं आणि त्याला चावत राहिलो. तो साप तिथेच मृत पावला,' असं किशोर यांनी सांगितलं. किशोर मेलेला साप घरी घेऊन आले आणि घडलेला प्रकार तिला सांगितला. त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी पसरली.
सर्पदंश झाल्यानं अनेकांनी किशोर यांना रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला. मात्र किशोर यांनी नकार दिला. त्यांनी पारंपारिक पद्धतीनं उपचार करणाऱ्या एका व्यक्तीचा सल्ला घेतला. त्याच व्यक्तीनं किशोर यांच्यावर उपचार केले. सापानं दंश करूनही किशोर यांना काहीच झालं नाही. त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे.