म्हणून या शहरातील महानगरपालिकेने म्हैशीवर केली जप्तीची कारवाई, कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:17 PM2022-03-03T17:17:01+5:302022-03-03T17:18:01+5:30
Jara Hatke News: थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी नगरपालिकेने तीन थकबाकीदारांच्या म्हैशी जप्त केल्याची आश्चर्यकारक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे.
ग्वाल्हेर - थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी नगरपालिकेने तीन थकबाकीदारांच्या म्हैशी जप्त केल्याची आश्चर्यकारक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. या थकबाकीदारांकडे लाखो रुपयांची थकबाकी होती. दरम्यान, या पैकी दोन थकबाकीदारांनी महानगरपालिकेत धाव घेऊन दीड लाख रुपजे जमा केले आणि म्हैस सोडवून नेली. मात्र एका थकबाकीदार शेतकऱ्याला थकबाकीचे ८२ हजार रुपये जमा करता आले नाहीत. त्यामुळे त्याची म्हैस जप्त करण्यात आली.
कुठल्याही स्थानिक प्रशासनाने म्हैस जप्त करण्याची संपूर्ण मध्य प्रदेशमधील ही पहिलीच घटना आहे. शहरातील मुरारनगर परिसरामध्ये पाणपट्टी जमा न करणाऱ्यांविरोधात पालिकेकडून सक्त कारवाई सुरू आहे. त्यात दीनानाथ पाल यांच्याकडे ६७ हजार ३५५ रुपये, अजमेर पाल ७७ हजार ८०० रुपये आणि राजेंद्र पाल यांच्यावर ८२ हजार ८९६ रुपये थकबाकी होती.
या तिघांनीही बऱ्याच दिवसांपासून पाणीपट्टी भरली नव्हती. त्यामुळे महानगरपालिकेने त्यांचा पाणीपुरवठा कापला होता. मात्र बुधवारी जेव्हा हे पथक या तिन्ही थकबाकीदारांच्या घरी आले तेव्हा त्यांनी अनधिकृत जोडण्या घेतलेल्या दिसून आल्या. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या थकबाकीदारांच्या घराकडे बांधलेल्या तीन म्हैशी जप्त केल्या. त्यानंतर दीनानाथ पाल आणि अजमेर पाल यांनी १ लाख ४५ हजार १५५ रुपये जमा केले आणि म्हैशी सोडवून नेल्या. मात्र राजेंद्र पाल यांना ८२ हजार ८९६ रुपयांची थकबाकी भरता आली नाही. त्यामुळे त्यांची म्हैस जप्त करण्यात आली. जप्त केलेली म्हैस लाल टिपारा येथील गोशाळेत पाठवण्यात आली आहे.