लग्नाचा जोरदार धमाका सुरू आहे. नवरी नटून थटून एकदम सज्ज आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात आज ती सर्वांत सुंदर दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू आहे आणि अतीव खुशीनं तिचे गाल गुलाबी झाले आहेत. लग्नाचा अत्यंत महागडा, डिझायनर ड्रेस घालून ती सगळीकडे मिरवते आहे. प्रत्येकाला भेटत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरते आहे. डोक्यापासून तर पायापर्यंत संपूर्णपणे मढलेली आहे. तिनं घातलेला नेकलेस आणि वेडिंग रिंगकडे तर लोक परत परत कौतुकानं बघताहेत. तिच्यासाठी आजचा दिवस खरंच अतिशय खास आहे. स्पेशल डे.. कारण तिचं आज लग्न आहे. तिच्या मैत्रिणीही नवे कपडे घालून तिच्याभोवती मिरवताहेत. घरचेही खूप आनंदी आहेत. मुलगी एकदाची लग्न करतेय म्हणून त्यांना समाधान आहे. वेडिंग हॉलही एकदम चकाचक सजलेला आहे. पाहुणे मंडळी जमली आहेत. जोरदार फोटोसेशन सुरू आहे. नव्या नवरीला तर किती फोटो काढू आणि किती नको, असं झालं आहे. फोटोग्राफरही फोटोसाठी एक से एक पोज तिला सुचवतो आहे. ते फोटो पाहून तिलाही तिच्या सौंदर्याचा अभिमान वाटतो आहे. हे फोटो ती लगेच सोशल मीडियावरही पोस्ट करते आहे. जेवणाचा बेतही असा की काही विचारूच नका. पैशांची कुठेच कमतरता नाहीये. जे पाहिजे ते सर्व अगदी मनासारखं. त्यामुळे लग्नाचा हा संपूर्ण सोहळाच प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीकडे सोपवलेला आहे.. तेही बारीक-सारीक गोष्टींकडे अगदी मनापासून लक्ष देताहेत....हे सगळं झालं; पण नवरदेव कुठे आहे, कुठे आहे त्याची वरात आणि बॅण्डबाजा? - तो मात्र कुठेच नाही. कारण या लग्नात नवरदेवाला आमंत्रणच नाही. त्याची गरजही नाही. कारण नवरी लग्न करते आहे ती स्वत:शीच. लाइफ पार्टनरला तिनं आयुष्यातून कायमचं हद्दपार केलं आहे. यापुढचं सारं आयुष्य स्वत:बरोबर काढण्याची, स्वत:शी एकनिष्ठ राहण्याची शपथ तिनं घेतली आहे...वाचून आश्चर्य वाटलं ना?.. पण ‘सोलो वेडिंग’चा हा ट्रेंड, विशेषत: तरुणींमध्ये गेल्या काही वर्षांपासून जपानमध्ये जोरात मूळ धरतो आहे. जपानमध्ये अनेक तरुण-तरुणींना विवाहात रस नाही. आपलं आयुष्य दुसऱ्याशी बांधून घेणं त्यांना मान्य नाही; पण लग्नात नटतात, तसं नटायला, स्वत:शीच लग्न करायला मात्र त्यांची ना नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यातला हा ‘स्पेशल डे’ साजरा करण्यासाठी, तो तसाच ‘खास’ व्हावा आणि आयुष्यभर सगळ्यांच्या लक्षात राहावा, यासाठी ते कोणतीही कसूर सोडत नाहीत. गेल्या दहा वर्षांपेक्षाही जास्त काळापासून हा ट्रेंड जपानमध्ये खूप प्रसिद्ध पावतो आहे; पण फक्त जपानच नाही, इटली, ऑस्ट्रेलिया, तैवान, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही हा ट्रेंड आता तेजीत आला आहे. तिथेही अनेक जण; विशेषत: तरुणी आयुष्यभर स्वत:शीच एकनिष्ठ राहण्याच्या आणाभाका घेत आहेत. त्या त्या देशांतल्या सरकारांना मात्र यामुळे धक्का बसला आहे. विवाहसंस्था तर यामुळे धोक्यात येत आहेच; पण समाजव्यवस्थेचा तोलही ढासळतो आहे.या सोलो लग्नांसाठी इव्हेन्ट कंपन्याही खूप मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. सगळ्यात स्वस्त सोलो वेडिंगचं पॅकेज तीन लाख येनपासून सुरू होतं. तुमची ऐपत आणि हौस असेल, त्यानुसार या लग्नासाठी तुम्ही कितीही खर्च करू शकता. जपानमधील मुली जोडीदाराबरोबर लग्नाला तयार नाहीत; पण त्यांना लग्नाची प्रचंड हौस मात्र आहे, हे लक्षात आल्यावर जपानच्या क्योटो या शहरात २०१४ मध्ये सेरेका ट्रॅव्हल या कंपनीनं पहिल्यांदा तरुणींसाठी ‘सोलो वेडिंग पॅकेज’ जाहीर केलं. त्याआधीही असे एकल विवाह होत होतेच; पण त्यांचं प्रमाण कमी होतं. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात पैसा आहे, हे लक्षात आल्यावर इतरही अनेक कंपन्या, वेबसाइट्स सोलो वेडिंगच्या व्यवसायात उतरल्या. या माध्यमातून आता अब्जावधी येन्सचा व्यवहार जपानमध्ये होतो. एखाद्या खरोखरच्या विवाह समारंभात जे काही होतं, त्या साऱ्या सेवा या कंपन्या पुरवतात. नवरीसाठी डिझायनर ड्रेस, दागिन्यांपासून ते बँक्वेट हॉल, नवरीसाठी दोन दिवसांसाठी हॉटेलमधला स्पेशल सूट, फोटो, व्हिडिओ शूटिंग, अल्बम, शाही खानपान, पाहुण्यांचीही नटायची व्यवस्था.. असा सारा लवाजमा जय्यत तयारीत असतो. इथे नसतो तो फक्त नवरदेव..
दीड वर्ष आधीच वेडिंग रिंग बुक !जपानमध्ये २०१७ मध्ये मोठ्या प्रमाणात एक सर्वेक्षणही करण्यात आलं होतं. त्यात तब्बल वीस टक्क्यांपेक्षाही जास्त तरुणींनी आपल्याला विवाह करायचा नाही, असं सांगितलं होतं; पण सोलो वेडिंग शूटसाठी मात्र त्या इच्छुक होत्या. अशा लग्नांसाठी आता वेडिंग प्लॅनर, फोटोग्राफर यांचीही मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेत तर सोलो वेडिंगसाठी तरुणी तब्बल एक ते दीड वर्ष आधीच वेडिंग रिंगसाठी ऑर्डर बुक करू लागल्या आहेत. ‘तू कधी लग्न करणार आहेस?’ या प्रश्नानं त्रासलेल्या वीस ते तीस वयोगटातील तरुणींनी लोकांचं तोंड बंद करण्यासाठीही सोलो वेडिंगचा पर्याय पसंत केला आहे.