जर तुम्ही आपल्या देशातील टपाल खात्याच्या (Postal Department) दिरंगाईचे किस्से सांगत असाल तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विकसित देशांमध्येही अशा घटना होतच असतात. उदाहरणार्थ अमेरिकेतीलच एक किस्सा घ्या. यात मुलाने आपल्या आईला लिहिलेलं पत्र ७६ वर्षांनंतर घरी पोहोचलं.
हे पत्र यूएस आर्मीचे सार्जंट जॉन गोन्साल्विस यांनी दुसऱ्या महायुद्धात (Second World War) आपल्या आईला लिहिलं होतं. हे पत्र ६ डिसेंबर १९४५ रोजी लिहिलं गेलं होतं, तेव्हा ते २२ वर्षांचे होते. जर्मनीत काम करत असताना त्यांनी आईला पत्र लिहून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. मात्र त्यावेळी हे पत्र त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकलं नाही ही गोष्ट वेगळी.
या हाताने लिहिलेल्या पत्रात परदेशात नोकरी करणाऱ्या मुलाने आपल्या आईचं सांत्वन केलं होतं. हे पत्र जर्मनीहून अमेरिकेतील पिट्सबर्गला पोहोचायला ७६ वर्षे लागली. खेदाची गोष्ट म्हणजे पत्र येईपर्यंत ना ते लिहिणारी व्यक्ती जिवंत होती, ना ज्याच्यासाठी पत्र लिहिले होते तो या जगात होता. जेव्हा युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिसला सार्जंट गोन्साल्विसच्या पत्नीबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी हे पत्र तिलाच पाठवलं. सार्जंट यांनी २०१५ सालीच जगाचा निरोप घेतला.
पत्रात सार्जंट यांनी त्यांच्या आईला आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती. त्यांनी लिहिलं होतं - 'प्रिय आई, आज तुझ्याकडून आणखी एक पत्र मिळालं आणि सर्व काही ठीक आहे हे जाणून आनंद झाला. मी देखील ठीक आहे आणि सगळं ठीक आहे, फक्त जेवण बहुतेक वेळा खराब असतं. तुला माझं खूप खूप प्रेम. तुझा मुलगा जॉनी तुला लवकरच भेटण्यासाठी उत्सुक आहे.'' सार्जंटची पत्नी अँजेलिनाने पत्र उघडले तेव्हा तिचा विश्वासच बसेना. हे पत्र तिच्या पतीने लग्नाच्या ५ वर्ष आधी आपल्या आईला लिहिलं होतं. जे आता घरी पोहोचलं आहे. महिलेनं सांगितलं की तिचा पती एक अतिशय चांगला व्यक्ती होता, ज्याच्यावर सगळेच प्रेम करत असे.