जगभरातून नेहमीच कुठेना कुठे नवीन काही शोध लागल्याच्या किंवा हजारो वर्ष जुना खजिना सापडल्याच्या घटना समोर येत असतात. अशा घटना जाणून घेण्याची उत्सुकताही लोकांमध्ये असते. महत्वाची बाब जेव्हा कुठे काही सापडतं किंवा एखादा खजिना सापडतो तेव्हा त्यासोबतच त्या काळातील अनेक गोष्टीही समोर येत असतात. स्पेनमधून अशीच एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. इथे साधारण तीन हजार वर्ष जुना एक खजिना सापडला आहे. या खजिन्यामध्ये काही वस्तू अशा सापडल्या आहेत ज्या आपल्या ग्रहावरील म्हणजे पृथ्वीवरील नाहीत. यात काही वस्तू उल्कापिंडापासून तयार केल्या आहेत. जे लाखो वर्ष जुने असू शकतात.
स्पेनच्या विलेनामध्ये सापडलेल्या खजिन्याबाबत वैज्ञानिक गेल्या काही महिन्यांपासून अभ्यास करत आहेत. या रिसर्चमधून समोर आलं की, १९६३ मध्ये सापडलेल्या खजिन्यात साधारण ५९ सोन्याचा थर असलेल्या वस्तू सापडल्या आहेत. पण यात एक छोटा पोकळ गोळा आणि एक बांगडीसारख्या दिसणाऱ्या कलाकृती आहेत. त्या लोखंडापासून बनवण्यात आल्यासारखं वाटतं. आता विचारात पाडणारी बाब ही आहे की, लोखंडाचा शोध तेव्हा लागलाच नव्हता. मग या वस्तू बनवल्या कशा?
रिसर्चमधून असंही समोर आलं की, पृथ्वीवर आढळणाऱ्या लोखंडाच्या तुलनेत कलाकृतींमध्ये निकेलचं प्रमाणही अधिक होतं. यावरून हे लोखंड उल्कापिंडाचं असल्याचं स्पष्ट होतं. यातून हे समोर येतं की, या वस्तू इतर खजिन्यासारख्याच जवळपास १४०० आणि १२०० ईसवीपू दरम्यान बनवण्यात आल्या होत्या. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, हे तेच उल्कापिंड धातु आहेत ज्यांना अंतराळातील अवशेष म्हटलं जातं. हे उल्कापिंड साधारण १० लाख वर्षाआधी पृथ्वीवर पडले असतील.
१९६३ मध्ये सापडला होता खजिना
रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, हजारो वर्षाआधी उल्कापिंड पृथ्वीवर पडत होते. त्यांचा वापर करून शोभेच्या वस्तू आणि दागिने, शस्त्र बनवण्याचं चलन होतं. हे मेटल दगडी उल्कापिंडामध्ये आढळत होतं. ज्या खजिन्याबाबत आता खुलासा झाला आहे त्याचा शोध आर्कियोलॉजिस्ट जोस मारिया सोलर यांनी डिसेंबर १९६३ मध्ये लावला होता. तेव्हा त्या एका नदीत खोदकाम करत होत्या. यावेळी त्यांना खजिना सापडला होता. त्यातील जास्तीत जास्त वस्तू सोन्यापासून बनलेल्या होत्या. यात अनेक कटोरे, बॉटल आणि बांगड्यांचा समावेश आहे.