मुंबई - अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) कोरोना संकट काळात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. सोनू सूदने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान देशातील कामगार आणि गरीब लोकांना नि:शुल्क बसेस, गाड्या व विमानांद्वारे त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली. या मदत कार्यामुळे सोनू सूदचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात आले. यातच आता विमान कंपनी स्पाईस जेटने सोनू सूदच्या या कामाचा अनोख्या पद्धतीने गौरव केला आहे. (spicejet salutes sonu sood for his philthropic work in a very special way)
देशांतर्गत विमान कंपनी स्पाईस जेटने सोनू सूदला सलाम करताना आपल्या कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 वर त्याचे एक मोठे छायाचित्र काढले आहे. या छायाचित्रासह सोनूसाठी इंग्रजीत एक खास ओळ लिहिलेली आहे. 'ए सॅल्यूट टू दी सेव्हियर सोनू सूद' म्हणजेच 'मसिहा सोनू सूदला सलाम.'
दरम्यान, सोनू सूदने या स्पायजेट बोईंग 737 चा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत स्पाईस जेटचे आभार मानले आहेत. तसेच, अनारक्षित तिकिटावर मोग्याहून मुंबईला आल्याची आठवण झाली. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा आभारी आहे. माझ्या नातेवाईंकांना भरपूर मिस करतोय, असे सोनू सूदने म्हटले आहे.
(LMOTY 2020: सोनू सूदचे नागपूरशी आहे खूप जवळचे नाते, कसे ते घ्या जाणून)
विशेष म्हणजे, कोरोना साथीच्या काळात सोनू सूदने देशभरात अडकलेल्या अनेक गरीब लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी केवळ मदत केली नाही तर जगभरातील उझबेकिस्तान, रशिया, अल्माटी, किर्गिस्तान या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही मदत केली होती. यासह, सोनू सूदने कोरोना संकट काळात कार्यरत सर्व डॉक्टर आणि फ्रंटलाइन कामगारांना देखील भरपूर मदत केली आहे.
(LMOTY 2020 : 'सोनू सूद हे करू शकतो तर सरकार का नाही?'; अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली सर्वांची मनं)