सॅन दिएगो : अमेरिकेतील सॅन दिएगो शहरात स्टारबक्सच्या कॉफीशॉपमधील लेनिन गुटेरेझ या कर्मचाऱ्याने मास्क न घातलेल्या एका महिलेची कॉफीची ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला. या त्याच्या कामगिरीवर खूष होऊन फेसबुकवरील सदस्यांनी त्याला ३२ हजार डॉलरची टीप देऊ केली आहे.
सॅन दिएगो येथील स्टारबक्सच्या कॉफीशॉपमध्ये अॅम्बर लिन गिल्स ही महिला मास्क न घालता गेली होती. त्यामुळे तिची कॉफीची ऑर्डर लेनिन गुटेरेझने घेतली नाही. यामुळे संतापलेल्या अॅम्बरने हा सारा प्रकार फेसबुकवर एका पोस्टमध्ये लिहिला. त्यामध्ये लेनिनवर सडकून टीका करण्यात आली होती.फेसबुकवर ही पोस्ट झळकताच अॅम्बरला अपेक्षित होते त्याहून वेगळेच काही घडले. ही पोस्ट वाचून फेसबुकवरील सदस्यांनी अॅम्बरवरच टीकेची झोड उठविली. लेनिन गुटेरेझने आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावले आहे अशीही प्रतिक्रिया असंख्य नेटकऱ्यांनी फेसबुकवरील या पोस्टखाली व्यक्त केली. उत्तम कामगिरीची बक्षिसी म्हणून फेसबुकवरील सदस्यांनी लेनिनला ३२ हजार डॉलरची टीप देऊ केली.५० हजार लोकांनी शेअर केली पोस्टमास्क न घातल्याबद्दल माझी ऑर्डर लेनिन गुटेरेझने घेतली नाही. पुढच्या वेळेला मी स्टारबक्सच्या कॉफीशॉपमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन जाणार आहे व वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेणार आहे असे अॅम्बर लिन गिल्स या महिलेने लिहिले होते. त्याबद्दलही फेसबुक सदस्यांनी तिला धारेवर धरले. या पोस्टवर एक लाख लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, ५० हजार लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.