निमगाव केतकी : निमगाव केतकीच्या गावठाणासह वाड्यावस्त्यांवर मागील महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पंचायत समीतीकडे टँकरची मागणी केली; परंतु अद्याप टँकर मिळाला नाही. ग्रामस्थांचे पाण्याअभावी होणारे हाल थांबविण्यासाठी येथील जिल्हा परिषेद सदस्य देवराज जाधव यांनी स्वखर्चाने पाण्यासाठी टँकर सुरू केला. टँकर पाणीसुविधा योजनेचा शुभारंभ आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.निमगाव केतकी (ता. इंदापूर) हे जवळपास २५ हजारांवर लोकसंख्या असलेले गाव आहे. या ठिकाणी दुष्काळ हा पाचवीलाच पुंजलेला आहे. यामुळे दर वर्षीच या ठिकाणी पाण्याची टंचाई असते. या वेळी देवराज जाधव यांनी सांगितले, की येथील नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. यासाठी आम्ही पंचायत समीतीकडे प्रस्ताव दिला आहे. रास्ता रोको केला. या वेळी आधिकाऱ्यांनी टँकर दोन दिवसांत देण्याचे आश्वासन दिले; परंतु टँकर मिळाला नाही. त्यामुळे टँकर सुरू केला. या वेळी अंकुश जाधव सरपंच छाया मिसाळ, उपसरपंच तुषार जाधव व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
स्वखर्चाने केला गावासाठी टँकर सुरू
By admin | Published: March 01, 2016 1:18 AM