स्त्री-पुरुष समानतेच्या याच्या गप्पा मारत असताना आपल्या घरातील गृहिणीला आपण किती मदत करतो याकडे पुरुषांचं पुर्णपणे दुर्लक्ष होत असतं. हे आम्ही म्हणत नाही तर एका सर्वेक्षणात सिध्द झाले आहे. एकविसाव्या शतकातही स्त्रियांकडून चुल आणि मुल याच गोष्टींची अपेक्षा केली जातेय, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर स्त्रियांनीच घरातली कामे केली पाहिजेत असं कित्येकांना आजही वाटतं. ती स्त्री बाहेर जाऊन कितीही कमवत असली तरीही घरी येऊन तिने रांधा-वाढा-उष्टी काढा हेही केलं पाहिजे असा सूर आजही कित्येक घरातून येत असतो.
पुरुष काम करून घर चालवतात, आर्थिक बोजा उचलतात म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. त्याउलट गृहीणींना केवळ घरातलीच कामं असतात म्हणून त्यांना तितकासा आदर दिला जात नाही. पण तुम्हाला माहितेय का एका सर्वेक्षणातून असं समोर आलं आहे की, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक काम करतात.
दि ओहीओ स्टेट युनिव्हर्सिटीमधील सहाय्यक प्राध्यापक आणि नामवंत लेखक क्लेर कॅम्प डश यांच्या अभ्यासानुसार, समतावादी मानणाऱ्या कुटूंबातही फक्त महिलाच घरातील कामं करताना आढळतात. घरगुती कामात पुरुष फार कमी वेळा मदत करतात. त्यामुळे समतावादी किंवा स्त्री-पुरुष समानता ही केवळ मानण्याची आणि बोलण्यापुरची गोष्ट राहिली असून प्रत्यक्षात आचरणात आणलीच जात नाहीत. हा अभ्यास करण्यासाठी क्लेर यांनी २५ जोडप्यांचा न्यू पँरेंट्स प्रोजेक्ट या अंतर्गत अभ्यास केला. या अभ्यासात स्त्री तीन महिन्यांची गरोदर असल्यापासून ते बाळ जन्माला आल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत स्त्री-पुरुषांच्या एकूण कामाच्या तासांचा अभ्यास करण्यात आला.
त्या अभ्यासात निष्पन्न झालं की, पत्नीच्या गरोदरपणात नवरा-बायको बरोबरीने कामं करतात मात्र तरीही पत्नीकडून थोड्याफार प्रमाणात अधिक काम केलं जातं. सुट्टीच्या काळात घरातील कामं किंवा मुलांना सांभाळण्यापेक्षा पुरुष जास्त प्रमाणात आराम करणं पसंत करतात. या सर्व्हेत असं समोर आलं आहे की, बाळाची काळजी घेण्यासाठी घेण्यात आलेल्या सुट्टीत ४६ टक्के पुरुष आराम करतात तर केवळ १६ टक्केच स्त्रिया आराम करतात. याचाच अर्थ बाळ जरी दोघांचं असलं तरी स्त्रियांना स्वतःच्या आरामापेक्षाही बाळाकडे अधिक लक्ष द्यावं लागतं.
त्याचप्रमाणे घरातल्या कामातही पुरुष स्त्रियांपेक्षा ३५ टक्के आराम करतात, पण स्त्रियांना मात्र फार कमी वेळ आराम करायला मिळतो. मात्र काही प्रकरणात घरातील स्त्रियांना पुरुषांनी कामं केलेली आवडत नाहीत. कदाचित परंपरांगत चालत आलेला पगडा या स्त्रियांवर असल्याने पुरुषांनी काम करणं त्यांना आवडत नाही.
एकूणच काय महिला कितीही शिकल्या आणि कमावु लागल्या तरी त्यांच्या वाट्याला येणारी घरगुती कामे केव्हाच कमी होणार नाहीत. ही कामं करायलाही स्त्रियांना काहीच हरकत नाही, मात्र थकून-भाकून आल्यावर आपल्या जोडीदारानेही आपल्याला घरकामात मदत करावी एवढीच माफक अपेक्षा या स्त्रियांची असतो. मात्र त्यांची ही अपेक्षा फार कमी घरात पूर्ण होताना दिसते.