अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाची चर्चा सुरूच आहे. या सिनेमाची कहाणी पुष्पा नावाच्या एका मजुराची आहे. तो एका खासप्रकारच्या लाकडाच्या तस्करीच्या धंद्यात उतरला आहे आणि मजुराचा मालक झाला आहे. पुष्पासारख्या मजुराला शक्तीशाली बनवणाऱ्या या खास लाकडाबाबत तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसेल तर जाणून घ्या की हे खासप्रकारचं लाकूड आहे रक्त चंदन (Red Sandal). पुष्पाची कहाणी भलेही काल्पनिक असो, पण सिनेमात जे रक्त चंदनाबाबत दाखवण्यात आलं ते खरं आहे.
हे केवळ लाकूड नाहीये तर भारताचा एक नैसर्गिक खजिना आहे. भारताच्या एका खास स्थानावर आढळणाऱ्या या रक्त चंदनाला लाल सोनं म्हटलं जातं. कारण या लाकडाला सोन्यासारखी काय तर त्यापेक्षाही जास्त किंमत आहे. त्यामुळे जग याला लाल सोनं म्हणतात.
सुगंध नसूनही मोठी किंमत
आपल्या देशात चंदन केवळ एक लाकूड नाही तर याला धार्मिक महत्वही आहे. टिळा लावण्यापासून ते धूप अगरबत्तीत वापरलं जाणारं हे लाकूड तीन प्रकारचं असतं, पांढरं, लाल आणि पिवळं. पण रक्त चंदनाची बातच वेगळी आहे. पांढऱ्या आणि पिवळ्या चंदनात सुंगंध असतो. पण लाल चंदनात सुगंध नसतो.
दारू बनवण्यात कामात येतं रक्त चंदन
लाल सोनं म्हणून ओळखलं जाणारं रक्त चंदन फार गुणकारी आहे. आयुर्वेद औषधीत याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हेच कारण आहे की जगभरात याची मोठी मागणी आहे. औषधासोबतच हे लाकूड फर्नीचर, सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी वापरलं जातं. इतकंच नाही तर दारू आणि कॉस्मेटिक्स तयार करण्यासाठीही याचा वापर होतो.
केवळ या ठिकाणी उगवतं रक्त चंदन
या झाडाची सरासरी उंची ८ ते १२ मीटरपर्यंत असते. हे चंदन भारतात सगळीकडे मिळत नाही. याची झाडं तामिळनाडूच्या सीमेवरील आंध्र प्रदेशातील चार जिल्हे नेल्लोर, कुरनूल, चित्तूर, कडप्पामधील डोंगरात आढळतात.
या झाडांची सुरक्षा करतं एसटीएफ
इंटरनॅशनल मार्केटमध्ये कोट्यावधी रूपयांना विकलं जाणाऱ्या चंदनाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. ही झाडं इतकी किंमती आहेत की, यांची सुरक्षा करण्यासाठी STF तैनात करण्यात आली आहे. भारतात तस्करी रोखण्यासाठी कठोर कायदे आहेत. चीनसहीत जपान, सिंगापूर, यूएई आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये या लाकडाची मोठी मागणी आहे. यात चीन असा देश आहे जिथे या लाकडाची सर्वात जास्त तस्करी होते.