भारतातील आतापर्यंत अनेक चोरांच्या कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. कुणी ताजमहाल विकला, कुणी लाल किल्ला विकला. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा चोराबाबत सांगणार आहोत ज्याने खोटी कागदपत्रे तयार करून तो जज बनला आणि अनेक केसेसचा निकालही लावला.
आम्ही सांगतोय ६० ते ९० च्या दशकातील चोर धनी राम मित्तलबाबत. धनी रामला आजही भारतातील सर्वात हुशार चोर मानलं जातं. हा काही साधासुधा चोर नाही. तो एलएलबी, हॅंडरायटिंग तज्ज्ञ आणि ग्राफोलॉजीचा डिग्री धारक आहे. या डिग्रींचा वापर करून तो अनेक चोऱ्या करत होता.
धनी राम मित्तलबाबत सांगितलं जातं की, त्याने वयाच्या २५ व्या वर्षांपासून चोरी करणं सुरू केलं होतं. १९६४ मध्ये पहिल्यांदा त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं होतं. भारतात चोरी प्रकरणी धनी राम सर्वात जास्त वेळा अटक होणारा एकुलता एक चोर आहे. अखेरची त्याला २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. पण तो पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता.
या हुशार चोराबाबत सांगितलं जातं की, त्याने आतापर्यंत १ हजारांपेक्षा जास्त गाड्या चोरी केल्या आहेत. धमी रामची सर्वात खास बाब ही आहे की, तो केवळ दिवसाच्या उजेडात चोरी करतो. एलएलबी, हॅंडरायटिंग तज्ज्ञ आणि ग्राफोलॉजी डिग्री असलेला धनी राम मित्तल आपल्या याच डिग्रींच्या मदतीने लोकांना फसवून गाड्या चोरी करत होता. नंतर खोटी कागदपत्रे तयार करून गाड्या विकत होता.
काही वर्षांपूर्वी पोलिसांनी धनी राम याला कोर्टात हजर केलं तेव्हा जज त्याला पुन्हा पुन्हा आपल्या कोर्टात पाहून म्हणाले की, तू आताच्या आत्ता माझ्या कोर्टातून निघून जा. जज इतकं म्हणाले आणि धनी राम पोलिसांच्या डोळ्यांदेखत पुन्हा फरार झाला होता. नंतर तो पोलिसांना म्हणाला होता की, जज साहेबांनीच मला जायला सांगितले होते.
धनी राम बनला होता जज?
धनी रामने खोटी कागदपत्रे तयार करून हरयाणातील झज्जर कोर्टाच्या एडिशनल सेशन जजला साधारण २ महिन्याच्या सुट्टीवर पाठवलं होतं आणि त्याच्याजागी स्वत: जजच्या खुर्चीवर बसला होता. यादरम्यान त्याने २ हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारांना जामीन दिला होता. सोबतच अनेकांना शिक्षाही दिली होती. पण पोलखोल होताच तो फरार झाला होता.
असे सांगितले जाते की, यानंतर जजने पुन्हा त्या गुन्हेगारांना तुरुंगात टाकलं होतं. ज्यांना धनी रामने जामिनावर सोडललं होतं. वर्तमानात धनी रामचं वय ८१ झालं आहे. पण आज तो कुठे आहे आणि का करतो याची माहिती कुणालाच नव्हती. तो आजही फरार आहे.