मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडावामध्ये एक दुर्मिळ घटना घडली आहे. मंगळवारी सकाळीच सरकारी रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली. या महिलेने चक्क 4 हात, 4 पाय, आणि 4 कान असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. नवरात्रातील नवमीचा दिवशी असं बाळ जन्माला आल्याने सर्वत्र याचीच जोरदार चर्चा रंगली आहे. 4 हात आणि 4 पायांच्या बाळाच्या जन्माने अनेकांना धक्का बसला आहे. नवरात्रीत या बाळाचा जन्म झाल्याने अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. कोणी ब्रह्माचा अवतार तर कोणी समाजासाठी हा अपशकुन असल्याचं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडवा जिल्ह्यातील मूंदी येथील सरकारी रुग्णालयात शिवरिया गावची रहिवासी असलेली महिला दाखल झाली होती. आज सकाळी नवमीच्या दिवशी तिने बाळाला जन्म दिला. पण त्याला चार हात, चार पाय, चार कान होते. जन्मतःच बाळाची प्रकृती चांगली होती. मात्र अर्ध्या तासानेच त्याचा मृत्यू झाला. सोशल मीडियावरही काही लोकांनी पोस्ट शेअर केल्या. त्यामुळे यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. हे बाळ पाहण्यासाठी रुग्णालयात लोकांनी मोठी गर्दी केली.
गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीसही बोलवावे लागले. या बाळाला जन्म देणारी महिला गुलका बाई आणि तिचे पती राहुल गार्वे हे दोघे दिव्यांग आहेत. राहुल गार्वे यांची दृष्टी अधू आहे तर गुलका बाई दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. मोलमजुरी करून हे दोघं पोट भरतात. त्यांना एक वर्षाची मुलगीदेखील आहे. शिवरियातील आशा कार्यकर्त्यांनी सांगितलं की, या महिलेला नियमितपणे आयर्नच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. योग्य लसीकरणही झालं होतं. काही दिवसांपूर्वी सोनोग्राफीही केली होती.
सोनोग्राफीतच बाळ अविकसित असल्याचं कळलं होतं. त्यानंतर तिला गर्भपात करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र महिलेने नकार दिला होता. या बाळावरून लोक अनेक चर्चा करत असल्या तरी डॉक्टरांनीही प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. शांता तिर्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती महिलांनी वेळेवर तपासण्या केल्या नाही तर अशा घटना घडतात. बहुतांश वेळा असे अविकसित बाळं जिवंत राहत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"