मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून सतत फोन येत होते व ती ते घेण्याचे टाळत होती. सरतेशेवटी तिने तो फोन घेतला व तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या महिलेला ११ कोटी रुपयांचे लॉटरीचे बक्षीस लागले होते व ते सांगण्यासाठी तो दूरध्वनी सतत घणघणत होता.या महिलेने वेस्टबरी फेस्टिवलमध्ये एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. तीच लॉटरी तिला लागली होती. ही बातमी अनोळखी क्रमांकावरून समजताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी करून फसवणूक केली जाण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. त्यामुळे अशा दूरध्वनींची सर्वांनीच धास्ती घेतलेली असते. ऑस्ट्रेलियातील टास्मानियामध्ये राहणाऱ्या या महिलेने सांगितले की, अनोळखी क्रमांकावरून आलेले दूरध्वनी मी कधीच उचलत नाही. कारण अशा दूरध्वनींद्वारे लोकांना विविध आमिषे दाखविली जातात.
विश्वास बसला नाहीलॉटरीचे बक्षीस मिळालेली महिला म्हणाली की, सातत्याने अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या दूरध्वनींमुळे माझी चिडचिड होत होती. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावावा म्हणून मी अखेर तो फोन उचलला व मला धक्काच बसला. लॉटरीचे तिकीट लागल्याचे समजल्यानंतर मला काही क्षण विश्वास बसेना. पण, ते सत्य होते!