सुट्टी हवी असताना शाळकरी विद्यार्थ्यांना शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना अर्ज द्यावा लागतो. काही विद्यार्थी कारणाशिवाय सुट्टी घेतात. सुट्टीसाठी काही विद्यार्थी अजब कारणं देतात, खोटंही बोलतात. काही आजारी असल्याचं सांगतात, तर काही जण नातेवाईकाचं निधन झाल्याचं सांगतात. मात्र एका विद्यार्थ्यानं सुट्टीसाठी सगळ्याच सीमा ओलांडल्या.
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. एका विद्यार्थ्यानं हाफ डेसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना अर्ज लिहिला. त्यात त्यानं असं कारण लिहिलं, ज्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 'माझं निधन झालंय, मसा अर्धा दिवस सुट्टी हवीय,' असं विद्यार्थ्यानं अर्जात नमूद केलं. विद्यार्थ्यानं अर्ज मुख्याध्यापकांना दिला. विशेष म्हणजे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला सुट्टी दिली. घटना उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील आहे.
आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं हाफ डेसाठी मुख्याध्यापकांकडे अर्ज केला. 'सकाळी १० वाजता माझं निधन झालं. तुम्ही मला अर्ध्या दिवसाची सुट्टी दिल्यास बरं होईल,' असं विद्यार्थ्यानं अर्जात म्हटलं. अर्जावर मुख्याध्यापकांनी लाल पेनानं 'मंजूर' असा शेरा दिला. काही दिवस विद्यार्थ्यानं अर्ज लपवून ठेवला. मात्र जेव्हा हा विद्यार्थ्याच्या मित्रांनी पाहिला, तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली आणि अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.