(Image Credit : Social Media)
क्वींसलॅंड युनिव्हर्सिटीतील एक प्रयोगशाळा काही असामान्य नमूने एकत्र करत आहे. हे नमूने ऑस्ट्रेलियातील २० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येचे मानवी मल-मूत्राचे आहेत. देशभरातील गटारींमधून नमूने घेऊन ते थंड करून युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांकडे पाठवण्यात आलेत. हे नमूने ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या समुदायाचा आहार आणि औषधांच्या सवयींबाबत माहिती मिळवण्यासाठी फायदेशीर मानले जात आहे. हे नमूने २०१६ मध्ये जमा करण्यात आले होते.
BBC ने दिलेल्या वृत्तानुसार, अभ्यासक ओ'ब्रायन आणि पीएचडी करणारे फिल चोई यांनी ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या समुदायाच्या आहार आणि जीवनशैलीसंबंधी सवयी जाणून घेण्यासाठी या नमुन्यांचं विश्लेषण केलं. त्यांना आढळलं की, सामाजिक-आर्थिक रूपाने संपन्न परिसरांमध्ये फायबर, सिट्रस(आंबट फळं) आणि कॅफीन(चहा-कॉफी)चं सेवन अधिक होत होतं. कमी संपन्न परिसरांमध्ये औषधांचं सेवन अधिक केलं जात होतं. म्हणजे याचा अर्थ असा काढण्यात आला की, श्रीमंत समुदायाचा आहार अधिक हेल्दी होता. ही सगळी माहिती त्या समुदायाच्या मल-मूत्रात दडलेली होती.
चोई आणि ओ'ब्रायन म्हणाले की, अभ्यासकांना अशाप्रकारे लोकांच्या जीवनशैलीमध्ये होणारे बदलांचे वास्तविक संकेत मिळू शकतात. ज्याने सार्वजनीक आरोग्य नीति तयार करण्यास मदत मिळेल. गटारातील पाण्याची टेस्ट करून एखाद्या समुदायाबाबत माहिती मिळवणे ही पद्धत गेल्या दोन दशकांपासून वापरली जात आहे.
यूरोप, उत्तर अमेरिका आणि दुसऱ्या ठिकाणांवर याचा वापर प्रामुख्याने नशेच्या औषधांच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. निकोटीन सारख्या औषधांच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी असा रिसर्च केला जातो.
चोई यांचं यावर असं मत आहे की, अनेकदा सर्व्हेक्षणांमध्ये लोक औषधांच्या वापराबाबत किंवा आहाराबाबत काही विचारल्यावर ते त्यांच्या वास्तविक सवयींपेक्षा स्वत:ला अधिक निरोगी असल्याचं सांगतात. अनेकजण हेल्दी आहार घेण्याचं प्रमाण अधिक सांगतात आणि स्नॅक्ससारखे पदार्थ कमी खात असल्याचं खोटं सांगतात.