बेल्जियम : एका गावातील लोकांचे रातोरात नशीब बदलले आहे. गावातील १६५ लोक एका रात्रीत श्रीमंत झाले आहेत. या लोकांनी एकत्रितपणे लॉटरीत १२०० कोटींहून अधिक रक्कम जिंकली. अशा प्रकारे प्रत्येकाच्या खात्यात ७ कोटी ५० लाख रुपये आले. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर बेल्जियमच्या अँटवर्प प्रांतात असलेल्या या ओल्मेन गावात जल्लोषाचे वातावरण आहे.
ओल्मेन गावातील १६५ लोकांनी मिळून युरोमिलियन लॉटरीची तिकिटे खरेदी केली. त्यासाठी प्रत्येकाने १,३०८ रुपये दिले होते. त्याचा नुकताच लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये त्यांच्या लॉटरीच्या तिकिटाचा नंबर आला. ज्यामुळे आता त्यांना १२३ दशलक्ष पौंड बक्षीस म्हणून मिळणार आहे. भारतीय चलनात ही रक्कम १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही रक्कम १६५ लोकांमध्ये वाटली तर प्रत्येकाच्या खात्यात साडेसात कोटी रुपये येतील.
विश्वास बसेनानॅशनल लॉटरीचे प्रवक्ते जॉक वर्मोरे म्हणाले की, ग्रुपमध्ये अशा प्रकारे बक्षीस जिंकणे ही नवीन गोष्ट नाही. मात्र, १६५ लोकांचा हा गट आतापर्यंतचा सर्वांत मोठा लॉटरी विजेता आहे. त्यांनी लॉटरी जिंकली आहे हे त्यांना ५ ते ६ वेळा सांगावे लागले, कारण लोकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता, असे त्यांनी सांगितले.