सूर्याशिवाय (The Sun) आपल्या विश्वाची कल्पनाच करणं शक्य नाही. सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत (Source of Energy) मानला जातो. सूर्य नसता तर या जीवसृष्टीची निर्मितीच झाली नसती. पृथ्वीवरची (The Earth) सर्व जीवसृष्टी आपल्या अस्तित्वासाठी सूर्यावरच अवलंबून आहे. मानवाला सूर्याच्या ऊर्जेचे अनेक फायदे मिळतात. दररोज सूर्यप्रकाशात फिरल्यामुळे शरीराला अत्यावश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन डीची (Vitamin D) पूर्तता होते. त्यामुळे अनेक आजारांपासून माणूस दूर राहू शकतो. तसंच वीजनिर्मितीतही सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा मोठा वाटा आहे. हाच सूर्य एक दिवस नाहीसा झाला तर? कधी कोणी कल्पना केली आहे?
अत्यंत भीतिदायक अशी ही कल्पना आहे. सूर्य नाही म्हणजे सर्वत्र अंधार. जीवसृष्टीच्या ऱ्हासाची ती सुरुवात असेल. शास्त्रज्ञांनी हीच भीती व्यक्त केली आहे. सध्या सूर्य ज्या प्रकारे प्रज्वलित होत आहे, त्यानुसार एक दिवस असा येईल जेव्हा सूर्य जळून राखेचा एक थंड गोळा होईल. येत्या ५ अब्ज वर्षांत ही वेळ येईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. आता सूर्य मधल्या टप्प्यात आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
स्मिथसॉनियन अस्ट्रोफिजिकल ऑब्झर्व्हेटरी (Smithsonian Astrophysical Observatory), हार्वर्ड कॉलेज ऑब्झर्व्हेटरी (Harvard College Observatory) आणि सेंटर फॉर अस्ट्रोफिजिक्सच्या ( Centre for Astrophysics) शास्त्रज्ञांनी याबाबत सखोल संशोधन केलं असून, सूर्यामध्ये होणाऱ्या अणुविघटन प्रक्रियेच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष नोंदवला आहे.
या प्रकल्पावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ पाओला टेस्टा यांच्या मते, 'ही गणना अणूच्या विघटन प्रक्रियेच्या आधारे करण्यात आली आहे. जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचं गूढ विज्ञानाला (Science) आजही उलगडलेलं नाही. १९३० पूर्वी असं मानलं जात होतं, की सूर्याची शक्ती गुरुत्वाकर्षण (Gravitational force) शक्तीपासून येते; पण आता आपल्याला अणुऊर्जेची (Atomic Energy) माहिती मिळाली आहे. सूर्य त्याच्या अणुऊर्जेमुळे जळतो. ज्या दिवशी ही ऊर्जा संपेल त्या दिवशी सूर्याचाही अंत होईल.'
नासा या अमेरिकेतल्या अंतराळ संशोधन संस्थेने (NASA) म्हटल्याप्रमाणे, सूर्य हा आपल्या सौरमालेचा केंद्रबिंदू असला तरी प्रत्यक्षात विश्वात अनेक मोठे तारे आहेत. सूर्यापेक्षा १०० पट मोठे अनेक तारे सापडले आहेत; मात्र ज्या दिवशी सूर्य संपेल, त्या दिवशी पृथ्वीही संपेल. अर्थात हे व्हायला अजून ५ अब्ज वर्षं बाकी आहेत, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. तेव्हा कोण पृथ्वीवर असेल माहिती नाही. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही; मात्र सूर्याविना पृथ्वीवरचं जीवन शून्य आहे. त्यामुळे सूर्य संपेल तेव्हा पृथ्वीही संपेल हे नक्की.