गुजरातच्या सूरत येथील एका हिरे व्यावसायिकाच्या 8 वर्षांच्या मुलीने आलिशान जीवनाचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळण्याच्या वयात हिरे व्यावसायिक धनेश यांची वारसदार कन्या संन्यास घेतल्यानंतर संन्यासी झाली आहे. देवांशी संघवी असं या मुलीचं नाव असून, ती दोन बहिणींमध्ये मोठी आहे. देवांशीने दीक्षा कार्यक्रमात दीक्षा घेतली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हिरे व्यापाऱ्याची मुलगी देवांशी संघवीने 367 दीक्षा कार्यक्रमात भाग घेतला आणि त्यानंतर संन्यास घेण्याची प्रेरणा मिळाली. एका मित्राने सांगितले की, तिने आजपर्यंत कधी टीव्ही पाहिला नाही की चित्रपट पाहिला नाही. एवढेच नाही तर ती कधीही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलेली नाही. देवांशीने संन्यासाचा मार्ग निवडला नसता तर ती मोठी झाल्यावर कोट्यवधी रुपयांच्या हिरे कंपनीची मालकीण बनली असती.
देवांशी ही धनेश संघवी यांची कन्या आहे आणि मोहन संघवी यांची नात आहे, ज्यांना संघवी अँड सन्स या राज्यातील सर्वात जुन्या हिरे बनवणाऱ्या कंपन्यांचे पितामह म्हटलं जातं. धनेश संघवी यांच्या मालकीच्या डायमंड कंपनीच्या जगभरात शाखा आहेत आणि वार्षिक उलाढाल सुमारे 100 कोटी आहे. देवांशीच्या धाकट्या बहिणीचे नाव काव्या असून ती आता पाच वर्षांची आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिरे व्यापारी धनेश आणि त्यांचे कुटुंब खूप श्रीमंत असले तरी त्यांची जीवनशैली अतिशय साधी राहिली आहे. हे घराणे सुरुवातीपासूनच धार्मिक आहे आणि देवांशीही लहानपणापासून दिवसातून तीन वेळा प्रार्थना करण्याचा नियम पाळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"