जयपूर- सीटबेल्ट न लावता कार चालविली म्हणून अनेकदा दंड आकारल्याचं पाहायला मिळतं. पण आता हेल्मेट न घालता भरतपूरमध्ये कार चालवत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. भरतपूरमध्ये एका 23 वर्षीय तरूणाला कार चालविताना हेल्मेट न घातल्याने ट्रॅफिक पोलिसांनी 200 रूपये दंड आकारला आहे. याचाच निषेध करण्यासाठी ही व्यक्ती आता कार चालविताना हेल्मेटचा वापर करते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
भरतपूरमधील सेवार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खरेरा गावात राहणाऱ्या विष्णू शर्मा या तरूणाने कार चालविताना हेल्मेट वापरलं नाही म्हणून दंड भरला. 1 डिसेंबर रोजी आगराहून मूळ गावी परतत असताना हा प्रकार घडला. रस्त्यात ट्रॅफिक पोलिसांनी त्याला थांबवून दंड भरायला लावला. गाडी चालविताना हेल्मेट वापरलं नाही, असं पोलिसाने चलनमध्ये नमूद केलं. या घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून विष्णू शर्मा या तरूणाने त्याच्याकडील व्हॅन चालविताना हेल्मेट वापरायला सुरूवात केली.
गावाला परत जात असताना मी गाडी चालवत होतो, तेव्हा माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स पेपर, गाडीचं रजिस्ट्रेशन सगळ्या गोष्टी होत्या. सीट बेल्टही घातलं होतं. पण तरीही मला दंड आकारण्यात आला. पोलिसांनी माझ्याकडून 200 रूपये दंड घेऊन चलन माझ्या हातात दिलं. त्यामध्ये हेल्मेट वापरलं नाही, असं कारण होतं. याचा निषेध करण्यासाठी मी दररोज व्हॅन चालविताना हेल्मेट वापरायला सुरूवात केली, असं विष्णू शर्मा यांने म्हंटलं आहे. पोलिसांबरोबर काही वाद झाला का? असंही विष्णूला विचारण्यात आलं पण पोलिसांशी काहीही वाद झाला नसून असा विचित्र दंड आकारला म्हणून मलाही आश्चर्य वाटल्याचं विष्णूने म्हंटलं.
विष्णूने सीट बेल्ट वापरला नव्हता म्हणून त्याला दंड आकारण्यात आला पण चलनमध्ये चुकीने हेल्मेट न वापरल्याचं कारण लिहिण्यात आलं, असं स्पष्टीकरण विष्णूला दंड आकारलेल्या ट्रॅफिक पोलिसाने दिलं आहे.