ऑनलाइन लोकमतवाराणसी, दि. 16 - शहरातील एका साडीच्या दुकानात दुकानदारानं एक आश्चर्यचकित करणारी स्कीम ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या दुकानात 1 रुपयालाही फारच महत्त्व प्राप्त झालं आहे. तुम्ही म्हणाल 1 रुपयात हल्ली काय येतं. पण थांबा तुम्हाला माहीत आहे का वाराणसीच्या एका दुकानात फक्त 1 रुपयामध्ये साडी मिळते. मात्र त्यासाठी तुम्हाला एक रुपयाची जुनी नोट घेऊन जावे लागणार आहे. या स्कीममुळे दुकानावर साड्या घेण्यासाठी महिला तुटून पडल्या आहेत. हजारोच्या संख्येनं महिला साडी घेण्यासाठी या दुकानात दाखल झाल्यानं मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. साडी घेण्यासाठी महिलांची रांग थेट रस्त्यांवर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, त्यांनी ही स्कीम तात्काळ बंद केली आहे. त्यामुळे सकाळपासून रांगेत ताटकळणा-या महिला भडकल्या आहेत. पोलिसांनी दुकान बंद केलं असून, महिलांना हटवण्यात यश आले आहे. साडी घेण्यासाठी आलेल्या एका महिलेनं सांगितलं की, 1 रुपयात साडी देतो असं बोलले होते आणि 1 ते 2 वाजेपर्यंत वेळ दिला होता. सकाळपासून लोक रांगेत उभे आहेत आणि आता सांगतायत की सरकारनं स्कीम बंद केली. मात्र सरकारला वाराणसीमध्ये किती लोक आहेत याची माहिती असायला हवे. अर्ध्या लोकांना साड्यांचं वाटपही करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महमूरगंज येथील एका दुकानदारानं 1 रुपयाच्या नोटेच्या बदल्यात एक साडी मिळणार आहे, अशा प्रकारच्या स्कीमचे बॅनरही लावले होते. या स्कीमच्या जाहिरातीनंतर हजारोंच्या संख्येनं महिलांनी सकाळपासूनच दुकानाच्या बाहेर रांगा लावल्या. दुकानदारांच्या मते, ही स्कीम फक्त 1 हजार साड्यांसाठी वैध होती. सुरुवातीला आम्ही 700 महिलांना साड्या दिल्या आहेत. मात्र आता सरकारनं आम्हाला साड्या विकण्यापासून मज्जाव केला आहे. मात्र दुकानदारांच्या अशा आमिष दाखवणा-या स्कीममुळे रांगेतील गर्दीत एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता असते.
आश्चर्य! ...इथे मिळते फक्त 1 रुपयात साडी
By admin | Published: February 16, 2017 6:59 PM